देवभूमीमध्ये पावसाचा प्रकोप; उत्तराखंडात ३४ जणांचे बळी; नैनितालशी संपर्क तुटला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 07:33 AM2021-10-20T07:33:43+5:302021-10-20T07:34:03+5:30
जोरदार पावसामुळे उत्तराखंडच्या वेगवेगळ्या भागात आणखी ३० जणांचे बळी
डेहराडून (उत्तराखंड) : देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तराखंड आणि केरळ या दोन्ही राज्यांमध्ये गेले काही दिवस पावसामुळे हाहाकार उडाला आहे. जोरदार पावसामुळे उत्तराखंडच्या वेगवेगळ्या भागात आणखी ३० जणांचे बळी गेल्याचे मंगळवारी उघडकीस आले. कुमाऊँ भागात घरे जमीनदोस्त झाली व अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. अल्मोडा, नैनिताल आणि उधमसिंहनगरमध्ये मोठी जीवितहानी झाली. पावसाने गेलेल्या बळींची एकूण बळींची ३४ वर पोहचली आहे. जवळपास ३०० जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
नैनितालकडे जाणाऱ्या तीन रस्त्यांवर सतत दरडी कोसळल्यामुळे पर्यटकांची वर्दळ असलेल्या या शहराचा इतर जिल्ह्यांशी संपर्क तुटला आहे. नैनिताल आणि काठगोदाम दरम्यान असलेला रेल्वेमार्ग वाहून गेला आहे. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी पुरात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या परिवाराला ४ लाख तर घराचे नुकसान झालेल्यांना १.९ लाखांच्या मदतीची घोषणा केली. (वृत्तसंस्था)
आठवडाभर धूमशान; अजूनही ऑरेंज अलर्ट
कोच्ची : केरळमध्ये गेला आठवडाभर सुरु असलेल्या पावसात एकूण ३८ जणांचे बळी गेले आहेत. राज्याच्या दक्षिण-मध्य भागातील जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस आणि भूस्खलन यामुळे नुकसान झाले.
या काळात शेकडो घरे व दुकांनांचे प्रचंड नुकसान झाले. १ ते १९ ऑक्टोबर दरम्यान केरळमध्ये १३५ टक्के अतिरिक्त पाऊस झाला.
केरळमध्ये २० ऑक्टोबरपासून पावसाचा आणखी एक टप्पा सुरू होणार असल्याचे भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे.
केरळच्या तिरुअनंतपुरम, पठानमथिट्टा, कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की, त्रिशूर, पलक्कड, मलप्पुरम, कोझीकोड, वायनाड, कन्नूर आदी १२ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.