चेन्नई : बंगालच्या खाडीतील नैऋत्य भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने चेन्नईसह तामिळनाडूच्या इतर भागात मंगळवारी दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाला. दरम्यान हवामान विभागाने तामिळनाडूतील काही भाग आणि पुडुचेरीत पुढील ४८ तासात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. चेन्नई, कुड्डालोर, विल्लुपुरम आणि तिरुवलूर जिल्ह्णात संततधार पावसामुळे आज शाळा महाविद्यालये बंद होती. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्णात सुटीची घोषणा केली. चेन्नई शहर जलमय झाले असून ठिकठिकाणी खडड्यांमध्ये पाणी साचले आहे. हवामान केंद्रात सकाळी ८.३० वाजताच्या नोंदीनुसार मागील २४ तासात परनगीपेट्टईत १५९.०, पुडचेरीत १५२.५ आणि कुड्डालोरमध्ये ९७.४ मिलीमीटर पाऊस झाला. यापूर्वीच्या पावसाने तामिळनाडूत हाहाकार घडवून आणला होता.