Rainfall Alert: मान्सून सक्रिय होताच देशभरात पावसाने हजेरी लावली आहे. मैदानी प्रदेशापासून डोंगराळ राज्यांपर्यंत, पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. डोंगराळ भागात तर पावसाने थैमान घातले आहे. सोमवारी हिमाचल प्रदेशमध्ये अचानक पूर आणि भूस्खलनामुळे चंदीगड-मनाली राष्ट्रीय महामार्ग बंद झाला. यामुळे शेकडो प्रवासी मंडीतच अडकून पडले. भूस्खलन आणि अचानक आलेल्या पुरामुळे 70 किलोमीटर लांबीचा मंडी-पंडोह-कुल्लू रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे.
हिमाचल-उत्तराखंडमध्ये 300 हून अधिक रस्ते ब्लॉकहिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे जवळपास 300 रस्ते बंद झाले आहेत, तर उत्तराखंडमध्ये सुमारे 43 रस्ते बंद आहेत. सीएम धामी यांनी भाविकांना हवामान खराब असल्यास प्रवास थांबवून हवामान खात्याच्या अंदाजाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. हिमाचलमध्ये 140 पॉवर ट्रान्सफॉर्मर खंडित झाले. मुसळधार पावसामुळे मंडी शहरापासून सुमारे 40 किमी अंतरावर असलेल्या पंडोह-कुल्लू मार्गावर खोटीनाल्ला येथे अचानक पूर आल्याने रविवारपासून प्रवासी अडकून पडले आहेत.
30 जूनपर्यंत सर्व रस्ते खुले केले जातीलसार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे 301 रस्ते बंद झाले आहेत. त्यापैकी 180 रस्ते सोमवारी सायंकाळपर्यंत खुले करण्यात येणार होते. त्याचबरोबर 15 रस्ते आज (मंगळवारी) तर उर्वरित रस्ते 30 जूनपर्यंत खुले करण्यात येणार आहेत. रस्ते मोकळे करण्यासाठी 390 जेसीबी, डोझर आणि टिप्पर तैनात करण्यात आले आहेत. तसेच, विभाग आज एक क्रमांक जारी करेल ज्यावर लोक रस्त्याशी संबंधित समस्या सांगू शकतील.
प्रवाशांसाठी अॅडव्हायझरी जारी राज्यातील संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक आणि पर्यटन पोलिसांनी सोमवारी एक सूचना जारी करून लोकांना अनावश्यक प्रवास टाळावा आणि नदी-नाल्यांजवळील ठिकाणी न जाण्यास सांगितले आहे. यासोबतच लोकांना राफ्टिंगसह इतर जलक्रीडा टाळण्यास सांगितले आहे. याशिवाय, अप्पर शिमला प्रदेश, किन्नौर, मंडी, कुल्लू, लाहौल-स्पीती आणि चंबा जिल्ह्यांमध्ये प्रवास करण्यापूर्वी प्रवाशांनी माहिती मिळवावी, असेही म्हटले आहे.