गुवाहाटी/इटानगर : सोमवारपासून संपूर्ण ईशान्य भारतात कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे आसाम, अरुणाचल प्रदेश, सिक्किम आणि मेघालयातील जनजीवन पार विस्कळीत झाले असून, अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर परिसरात पूरजन्य परिस्थितीही निर्माण झाली आहे. आसाममध्ये साडेतीन लाखांहून अधिक लोक बेघर झाले असून, त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.जोरदार पावसामुळे नहरलागून ते इटानगर यामधील राष्ट्रीय महामार्गाचा मोठा भाग वाहूनच गेला आहे. त्यामुळे राजधानीच्या शहराशी असलेला संपर्क तुटला आहे. या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा जुलांग रस्ताही पुरता खचून गेला आहे. पावसाचा सर्वाधिक फटका पापुप पारे जिल्ह्याला बसला आहे. इटानगर व नहरलागून ही दोन्ही मोठी शहरे याच जिल्ह्यात आहेत. बारापानी नदीवरील हा पूरही पाण्याखाली गेला असून, पुराचे पाणी बंदेरवारा, निर्जुली, नहरलागून व इटानगरमधील काही घरांमध्ये पाणी शिरले आहे. पावसामुळे घरे, रेल्वेमार्ग, रस्ते यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यातील नदीच्या किनारी तसेच पहाडी भागांत राहणाऱ्या लोकांना स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आल्या आहेत. सागली गावात अडकलेले चार रुग्ण, तीन मुले, महिला व विद्यार्थ्यांसह २0 जणांना हेलिकॉप्टरच्या साह्याने नहरलागून येथे हलविण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. तिथे मोठ्या प्रमाणात दरडी कोसळत आहेत.आसाममध्ये दोन लहान मुले पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. ब्रह्मपुत्रा, दिखोव, जिया भारली, बराक आणि कुशियारा या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने आसपासच्या नागरिकांना अन्यत्र हलवण्यात आले आहे. आतापर्यंत त्या भागांत ७७ मदत केंद्रे उभारण्यात आली आहेत. आसाममधील लखिमपूर, जोरहाट, गोलाघाट, धेमाजी, नागाव, विश्वनाथ, करीमगंज, सोनितपूर या भागांत पावसाचा आणि पुराचा मोठा फटका बसला आहे. (वृत्तसंस्था)
ईशान्येकडील राज्यांमध्ये पावसाचा हाहाकार
By admin | Published: July 05, 2017 1:25 AM