लखनऊ : उत्तरप्रदेशमध्ये गेल्या 24 तासांपासून सुरु असलेल्या मुसळधार वादळी पावसामध्ये 16 जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखम झाले आहेत. शनिवारी शाहजहापूर जिल्ह्यामध्ये वीज कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला. तर ललितपूर, झाशी जिल्ह्यामध्ये बेतवा नदीच्या पुरामध्ये 14 जण अडकले होते. त्यांना ग्वाल्हेर येथील तळावरील हवाई दलाच्या जवानांनी हेलिकॉप्टरद्वारे वाचविले.
उत्तर प्रदेशमधील मुसळधार पावसामुळे 16 जिल्ह्ये सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. 461 घरांचे नुकसान झाले असून 18 जनावरे ठार झाली आहेत . तर दिल्ली आणि मध्यप्रदेशमध्येही जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. शुक्रवारी रात्रीपासून दिल्लीमध्ये पाऊस होत आहे. तेथील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी घरामध्ये घुसले आहे. मध्यप्रदेशमध्ये नद्या नाले धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. उत्तराखंडमध्येही धो-धो पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे.