देहरादून : उत्तराखंडमध्ये मंगळवारी रात्री सर्वदूर झालेल्या पावसाने राज्याच्या जंगलांतील अग्नितांडव आटोक्यात आणण्याच्या मोहिमेला मोठा हातभार लागला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात भडकलेल्या वणव्याने आतापर्यंत अडीच हजार हेक्टर क्षेत्रातील बहमूल्य वनसंपदा भस्मसात करण्यासह सात जणांचा बळीही घेतला आहे. वणवा नियंत्रणात आणण्यास लष्करालाही पाचारण करण्यात आले होते. रात्रीच्या पावसाने ही परिस्थिती सुधारण्याची आशा निर्माण झाली. हवामान केंद्राचे संचालक विक्रम सिंह यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, डोंगराळ भागासह इतरत्र काल रात्रभर पाऊस झाला. पिठोरागड जिल्ह्यातील मुनस्यारी येथे ११ मि.मी., तर देहरादूनमध्ये सात मि.मी. पावसाची नोंद झाली. राज्यात सर्वदूर पाऊस झाला. तथापि, सर्व ठिकाणच्या नोंदी मिळण्यास थोडा अवधी लागेल. राज्यातील वणवा नियंत्रणात आणण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेला या पावसाने मोठा हातभार लागला आहे. उत्तर काशी जिल्ह्यात दोन फेब्रुवारी रोजी जंगलात आग लागण्याच्या यावर्षीच्या पहिल्या घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला होता, तर गेल्या महिन्यात नैनिताल जिल्ह्यात वणव्याने वसाहतीला कवेत घेतल्यामुळे झारखंडची महिला आणि तिच्या सहावर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. याशिवाय चमोली जिल्ह्यात दोन मे रोजी आग आटोक्यात आणण्याच्या मोहिमेवरील पोलीस शिपायाचा डोंगरावरून अंगावर दगड पडून मृत्यू झाला होता. हिमाचल प्रदेशातील किमान सहा जिल्ह्यांच्या अंतर्गत येणाऱ्या जंगलांमधील वणवा अद्याप पूर्णत: विझलेला नाही. या जिल्ह्यांत सिमला, कुल्लू यांचाही समावेश आहे. तसेच काश्मीरच्या राजौरी भागातील जंगलातही आग धुमसत असून, ती विझवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.मुख्य वनरक्षक बी.पी. गुप्ता यांनी जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या फेब्रुवारीत भडकलेल्या वणव्याने राज्यातील 3465.94हेक्टर वनक्षेत्राची राख झाली आहे. जंगलातून निघणाऱ्या धुरामुळे गुदमरून एका फायर वॉचरचा मृत्यू झाला. पौडी जिल्ह्यातील मटियाली क्षेत्रात घडलेल्या या घटनेने वणव्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढून सात झाली आहे.
उत्तराखंडातील वणवा पावसाने विझतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2016 3:05 AM