नवी दिल्ली : देशात मान्सूनला सुरुवात झाली आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सुद्धा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अमरनाथ यात्रा काही वेळासाठी थांबविण्यात आली आहे. पाऊस थांबेपर्यंत यात्रेकरूंना बालटाल आणि पहलगाम येथील कॅम्पमध्ये थांबविण्यात आले आहे.
अमरनाथ यात्रेसाठी काल (दि.27) भाविकांची पहिली तुकडी जम्मूतील भगवतीनगर बेस कॅम्पमधून रवाना झाली आहे. या तुकडीत एकूण 1904 भाविकांचा समावेश आहे. यामध्ये 1554 पुरुष, 320 महिला आणि 30 मुले आहेत. जम्मू काश्मीरचे मुख्य सचिव बीवीआर सुब्रमण्यम, जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांचे सल्लागार विजय कुमार आणि बीबी व्यास यांनी अमरनाथ यात्रेच्या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखविला.
अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचे सावट असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे त्यामुळे महामार्गावर सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या विशेष तुकड्या तैनात केल्या आहेत. अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी सर्व त्या उपाययोजना केल्या जात आहेत. प्रथमच सुरक्षेसाठी महिला सैनिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, सुरक्षेसाठी यात्रा मार्गावर सुरक्षा रक्षकांशिवाय ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. याशिवाय, भाविकांना लष्कराचा घेरा काश्मीरपासून अमरनाथ गुहेपर्यंत असणार आहे.
दरम्यान, अमरनाथ यात्रेला सुरूवात होण्याच्या एक दिवस आधीच हिज्बुल मुजाहीद्दीन या दहशतवादी संघटनेने एक कथित ऑडिओ क्लिप जारी केले आहे. त्यामध्ये हिज्बुल मुजाहीद्दीनने अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्यास नसल्याचे स्पष्ट केले आहे. अमरनाथ यात्रेकरु आमचे पाहुणे आहेत, त्यांच्यावर हल्ला करण्याचा आमचा कोणताही विचार नाही, असे या ऑडिओ क्लिप म्हटले आहे.