हैदराबाद - मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालं असून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला असून अनेक ठिकाणी नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसामुळे शहरातील जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झालं आहे. पावसाशी संबंधित घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याचीही माहिती मिळाली आहे. परिस्थितीशी सामना करण्यासाठी महापालिका आणि पोलिसांनी पुर्ण तयारी केली आहे. दरम्यान मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी ही आणिबाणीची परिस्थिती असल्याचं सांगितलं आहे. गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका असं आवाहन त्यांनी केलं आहे. पुढील 48 तासात अजून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी 4.30 वाजल्यापासून ते आठ वाजेपर्यंत एकूण 67.6 मिमी पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे सखल परिसरांमध्ये तर पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. संपुर्ण शहरात वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरु होती. हैदराबाद महापालिकेने कर्मचा-यांना शहरात जमा झालेलं पाणी काढण्यासाठी आणि बचावकार्याच्या कामाला लावलं होतं.
पावसामुळे शहरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसामुळे आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. मृतांमध्ये चार महिन्यांचा एक मुलगा आणि त्याच्या वडिलांचा समावेश आहे. संरक्षक भिंतीचा भाग घरावर पडल्याने मुलगा आणि त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. नायडूनगर येथे ही घटना घडली. तर विजेच्या धक्क्याने 35 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी घटनेची माहिती घेतली असून महापालिका आयुक्त जनार्दन रेड्डी आणि पोलीस आयुक्त महेंदर रेड्डी यांना अलर्ट राहण्याचा आदेश दिला आहे. अधिका-यांना स्पष्ट आदेश देताना बचावकार्य आणि लोकांच्या मदतीसाठी सर्व ती तयारी करण्यास सांगितलं आहे.
पावसाचा कहर लक्षात घेता परिस्थिती अजून बिघडण्याची शक्यता आहे. यामुळे उस्मानिया विद्यापीठाने पुढील सरकारी आदेश मिळेपर्यंत विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी होणा-या सर्व परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यासंबंधी नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.