केरळमध्ये पावसाचा हाहाकार, ६७ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 04:20 AM2018-08-16T04:20:39+5:302018-08-16T04:21:01+5:30
केरळमध्ये ८ आॅगस्टपासून सुरू असलेल्या पावसामुळे हाहाकार उडाला आहे. वायनाड, कोझीकोड, कन्नूर, कासरगोड, मलप्पुरम, पलक्कड, इदुक्की व एरनाकुलम येथे अतिवृष्टीमुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोची : केरळमध्ये ८ आॅगस्टपासून सुरू असलेल्या पावसामुळे हाहाकार उडाला आहे. वायनाड, कोझीकोड, कन्नूर, कासरगोड, मलप्पुरम, पलक्कड, इदुक्की व एरनाकुलम येथे अतिवृष्टीमुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. निसर्गाच्या या प्रकोपामुळे आतापर्यंत ६७ जणांचा बळी गेला असून मुसळधार पावसाचा फटका येथील विमानसेवेलाही बसला आहे. अतिदक्षतेचा इशारा म्हणून कोची येथील आंतरराष्टÑीय विमानतळाच्या सेवा शनिवार, १८ आॅगस्टपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
पावसामुळे येथील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे़ त्यामुळे हजारो लोक बेघर झाले आहेत. मदत व बचाव कार्य वेगाने सुरू आहे. कोची विमानतळानजीक असलेल्या पेरियार नदीवरील धरण अतिवृष्टीमुळे ओव्हरफ्लो झाल्याने पाणी विमानतळाच्या धावपट्टीवर आले आहे. त्यातच येथील वायंड, कोझिकोडे, कन्नूर, केसरगोडे, मलप्पूरम, पलक्कड, इडुक्की तसेच इरनाकुलम जिल्ह्यांत गुरुवारपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे सर्वप्रथम खबरदारी म्हणून बुधवारी दुपारी २ वाजेपर्यंत येथून एकाही विमानाचे उड्डाण न करण्याचा निर्णय विमानतळ प्रशासनाने घेतला होता. पुढील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर विमानसेवा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे कोचीन विमानतळ प्रशासनाने जाहीर केले होते. दरम्यान, पावसाचा जोर कायम असल्याने तसेच पाण्याचा निचरा होत नसल्याने आता शनिवारपर्यंत विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय विमानतळ प्रशासनाने जाहीर केला आहे.
कोझीकोड, इरानल स्थानकांदरम्यान दरड कोसळल्यामुळे गुरुपायर-चेन्नई एग्मोर एक्स्प्रेस, कन्याकुमारी-मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस, दिबुगढ-कन्याकुमारी विवेक एक्स्प्रेस आणि गांधीधाम-तिरुनेलवली हमसफर एक्स्प्रेस या चार गाड्या उशिराने धावत असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले. (वृत्तसंस्था)