तिरुवअनंतपुरम : केरळ राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. पाऊस आणि महापुरामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी हेलीकॉप्टरने पूरग्रस्त भागाची पाहणी केली.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्यासह पूरग्रस्त भागाचा दौरा करुन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी केरळला 100 कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची घोषणा केली. गेल्या महिन्यातच केंद्र सरकारने केरळला 80.25 कोटींची मदत केली होती. आतापर्यंत 37 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 55 हजारांपेक्षा अधिक लोक बेघर झाले आहेत. एर्नाकुलम, त्रिशूर आणि वयानड जिल्ह्यांमध्ये पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. शिवाय या भागात 14 ऑगस्टपर्यंत रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे. केरळमध्ये सकाळी काहीसा पाऊस ओसरला होता. मात्र दुपारनंतर पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली.
दरम्यान, राज्यातील पोलीस, एनडीआरएफ, लष्कर आणि काही संघटनांकडून पूरग्रस्त भागातील लोकांची मदत करण्यात येत आहे. या नैसर्गिक संकटामुळे मोठे नुकसान झाले आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीसाठी आवाहन केले आहे, असे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगितले. याशिवाय, घर आणि जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या पीडितांसाठी केरळ सरकारने 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तर मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपये दिले जाणार आहेत.