पावसाने केरळला झोडपले, तीन जिल्ह्यांत रेड अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 09:44 AM2021-11-15T09:44:55+5:302021-11-15T09:45:21+5:30
मुख्यमंत्री विजयन यांनी जिल्हाधिकारी आणि अन्य अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे
पथनमथिट्टा/इडुक्की (केरळ) : शनिवारी रात्रीपासून केरळच्या विविध भागात होत असलेल्या जोरदार पावसामुळे हवामान विभागाने इडुक्की, एर्नाकुलम आणि त्रिसूर या जिल्ह्यांत रविवारसाठी रेड अलर्ट घोषित केला आहे. केरळमध्ये यापूर्वी आलेल्या पुरात १८ लोकांचा मृत्यू झाला होता.
मुख्यमंत्री पी. विजयन यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, जोरदार पावसामुळे भूस्खलन आणि अन्य धोकादायक घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासन आणि जनतेने अति सावधान राहावे. पूरप्रवण आणि भूस्खलन होणाऱ्या भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी किंवा नजीकच्या मदत छावण्यात हलविण्यात यावे.
मुख्यमंत्री विजयन यांनी जिल्हाधिकारी आणि अन्य अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. जोरदार पावसामुळे साबरीमला येथील श्री अय्यप्पा मंदिर दर्शनासाठी पुढील तीन ते चार दिवस भाविकांची संख्या मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे यात म्हटले आहे.
जोरदार पावसामुळे केरळमधील विविध धरणांची पाणी पातळी धोक्याच्या पातळीपर्यंत वाढली आहे. त्यामुळे सरकारने चेरुथोनी धरणाचा एक दरवाजा दुपारी उघडला. केरळचे जलसंसाधन मंत्री रोशी ऑगस्टिन यांंनी फेसबुकवरील पोस्टमध्ये सांगितले की, केरळच्या दक्षिण भागातील जोरदार पावसामुळे धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचा एक दरवाजा ४० सेंटीमीटर उघडण्याचा निर्णय घेण्यात आला.