जयपूर, दि. 25- मुसळधार पावसामुळे राजस्थानला पूराने वेढलं आहे. या पुरामुळे राजस्थानमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. मंगळवारी सकाळी भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टर्सच्या मदतीने ७ जणांना वाचवण्यात आलं आहे. दक्षिण राजस्थानातील जॅलोर जिल्ह्याला पूराच्या पाण्याने वेढल्यामुळे तेथिल लोक स्वतःचा बचाव करण्यासाठी झाडावर जाऊन बसले होते. त्यांना हवाई दलाच्या बचाव पथकाने सुखरूप सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. राजस्थानमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊन सुरू आहे त्यामुळे खराब हवामानाचा फटका बचाव पथकांना बसतो आहे. सोमवारी तेथिल खराब हवामान आणि ढगाळ वातावरणामुळे हेलिकॉप्टरच्या सहाय्याने या लोकांना वाचवण्यात अडथळे येत होते.
आणखी वाचा
पुरामुळे राजस्थानातील जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र पहायला मिळतं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जॅलोर, पाली, सिरोही, जोधपूर आणि बारमर या ५ जिल्ह्यांमधील शाळा मंगळवारी बंद राहणार आहेत. तसंच पुढील ४८ तासांत पूरस्थितीचा अंदाज घेऊन शाळा सुरु ठेवायच्या किंवा नाही याचा निर्णय घेण्यात येणार आहे. तसंच जय नारायण व्यास विद्यापीठाकडून मंगळवार आणि बुधवारी घेण्यात येणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.
सोमवार आणि मंगळवारी केलेल्या बचाव कार्याने सुमारे २०० जणांना वाचवण्यात यश आलं आहे. जॅलोरच्या विविध भागात लष्करच्या तीन तुकड्या मदतीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. या ठिकाणी संपूर्ण रस्ता मार्ग बंद झाला आहे. जॉलोरच्या विविध भागात तीन आर्मीची पथकं तैनात करण्यात आली आहेत. तसंच नागरिकांच्या मदतीसाठी एनडीआरएफची दोन पथकं आणि एसडीआरएफची दोन पथकं बचावकार्य करत असल्याची माहिती जोधपूरचे विभागीय आयुक्त रतन लाहोटी यांनी हिंदूस्तान टाइम्सला दिली आहे. जोधपूरच्या हवाई तळावरून दोन हेलिकॉप्टर्स बचाव कामासाठी पाठवण्यात आली आहेत. त्यांनी बचावाचे कामही सुरु केलं असल्याचं संरक्षण प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल मनीष ओझा यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, राजस्थानात गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस झाला असून अजून त्याची आकडेवारी उपलब्ध झालेली नाही. जोधपूर प्रशासकीय विभागात येणाऱ्या जोधपूर, बारमेर, जैसलमेर, जॅलोर, पाली आणि सिरोही या जिल्ह्यांमध्ये १ जून ते २४ जुलै या काळात सरासरी पावसापेक्षा ६० टक्के अधिक पाऊस पडला आहे.
गुजरातमध्ये मुसळधार पाऊस
गुजरातमध्ये गेल्या दोन दिवसांपासून कोसळणार्या पावसामुळं आलेल्या पुरानं आतापर्यंत 72 जणांचा बळी घेतला आहे. हवामान विभागाने गुजरात, राजस्थान, आसम, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यात हाय अलर्ट जारी केला आहे. तसंच येणाऱ्या दोन दिवसांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.उत्तर गुजरातमधील सौराष्ट्र, बनासकांठा आणि साबरकांठा तसंच दक्षिण गुजरातमधील वलसाडला पूराचा सर्वाधिक फटका बसला आहे. आतापर्यंत 7 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. नदी, नाले व रस्ते पाण्याखाली गेल्याने गुजरातमधील रस्ते व रेल्वेसेवा बंद करण्यात आल्या आहेत. गेल्या दोन दिवसात पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने 900 जनावरांचा मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कर आणि हवाईदलाला पाचारण करण्यात आले आहे. मोर्बी, राजकोट, सुरेंद्रनगर, बनासकांठा आणि अहमदाबाद जिल्हे पाण्याखाली गेल्याने नागरिकांनी सरकारी इमारती व शाळांमध्ये आश्रय घेतला आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत असल्याने अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने वीजप्रवाह ठप्प झाले आहेत. 19 राज्यमार्ग आणि 102 अंतर्गत रस्ते बंद करण्यात आले आहेत.