लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: रविवारी उत्तर आणि वायव्य भारतात मुसळधार पावसाने किमान २८ लोकांचा मृत्यू झाला. यात दरडी कोसळणे, वाहतूक कोंडी आणि घरे कोसळण्याच्या घटना घडल्या. हरयाणात धरण फुटल्याने अनेक गावे जलमय झाली. दिल्ली, पंजाब, बिहार, राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली असून, वाहने पाण्यात अडकली आहेत. दिल्लीतील रोहिणी पार्कमध्ये पाण्यात बुडून ७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. नेपाळच्या तराई भागातील पावसामुळे बिहारच्या पूरस्थिती निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. पाण्याचा स्तर वाढल्याने अनेक ठिकाणी लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे.
बिहारच्या पाटणा, भागलपूरसह अन्य जिल्ह्यांत गंगा, कोसी व अन्य नद्यांची पाणी पातळी सतत वाढत असून, नद्यांचे रौद्र रूप पाहून लोकांची धाकधूक वाढत आहे. मुसळधार पाऊस आणि मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर धरणातून पाणी सोडल्यामुळे गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील सरदार सरोवर धरणाच्या पाण्याची पातळी वाढली आहे.
लग्नाला निघाले होते, नदीत कार घातली अन् घात झाला
होशियारपूर : पंजाबच्या होशियारपूरपासून सुमारे ३४ किमी अंतरावर असलेल्या जैजों येथे पूर आलेली नदी पार करताना वाहन वाहून गेल्याने एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू झाला असून, १ जण बेपत्ता झाला. पंजाब आणि इतर भागात मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला आहे. हे कुटुंब हिमाचल प्रदेशातील मेहरोवाल येथे एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी जात असतानाच ही घटना घडली आहे. स्थानिक नागरिकांनी अथक प्रयत्न करून या वाहनातील एकाची सुटका केल्याने तो वाचला आहे. नदीतून दोन महिलांसह सात जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बेपत्ता झालेल्या तिघांचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.