शिमला :हिमाचल प्रदेशात आतापर्यंत सरासरीच्या दीडपट पाऊस झाला असून, मंडी, शिमला, हमीरपूर, कांगडा आणि बिलासपूर जिल्ह्यांत जास्त विध्वंस झाला आहे. या पावसामुळे सुमारे १०,००० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज असून, तीन दिवसांत ७४ जणांचा मृत्यू झाला असून, २ हजारांहून जास्त जणांना वाचवण्यात आले. तर पावसाळा सुरू झाल्यापासून २१७ जणांनी प्राण गमाविले आहेत. राज्य सरकारने केंद्राकडे ६,६०० कोटी रुपयांची मदत मागितली आहे.
मंडी जिल्ह्यात सामान्यपेक्षा ३१७ टक्के, बिलासपूरमध्ये २२५ टक्के आणि शिमलामध्ये १९१ टक्के अधिक पाऊस झाला. ८००हून अधिक रस्ते, ११३५ विद्युत ट्रान्स्फॉर्मर आणि २८५ पिण्याच्या पाण्याच्या योजना ठप्प झाल्या आहेत. रस्ते बंद झाल्यामुळे १८०० हून अधिक मार्गावरील बससेवा तीन दिवसांपासून ठप्प आहे. ११ ते १७ ऑगस्टदरम्यान राज्यात सामान्यत: ६४ मिमी पाऊस पडतो. मात्र, यावेळी १३५.१ मिमी पाऊस झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. (वृत्तसंस्था)
१४ मृतदेह सापडले; ७ अजूनही बेपत्ता
शिमल्याच्या समर हिल परिसरात गुरुवारी सलग चौथ्या दिवशी बचाव कार्य सुरू आहे. येथे १४ ऑगस्ट रोजी शिवमंदिरावर दरड कोसळली होती. या अपघातात आतापर्यंत १४ जणांचे मृतदेह सापडले, तर ७ अजूनही बेपत्ता आहेत.
उत्तराखंडमध्ये शेकडो संसार उघड्यावर
उत्तराखंड राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे म्हणणे आहे की, या हंगामात राज्याचे आतापर्यंत ६५० कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. शेकडो लोकांचे संसार उघड्यावर आले आहेत. सततच्या भूस्खलनामुळे लोक घरसामान बांधून सुरक्षित ठिकाणी जायला निघाले आहेत.
महाराष्ट्रासह या राज्यांना अजून प्रतीक्षाच
पुढील दाेन दिवसांमध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहार या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे. छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल व ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पंजाबच्या आठ जिल्ह्यांमध्ये पूर
अमृतसर : मुसळधार पावसामुळे पंजाबमधील आठ जिल्हे पुराच्या तडाख्यात सापडले आहेत. भाक्रा धरणाचे दरवाजे उघडल्याने सतलज नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. रोपर, होशियारपूर, गुरुदासपूर, कपूरथला, अमृतसर, तरनतारन आणि फिरोजपूरला पुराच्या पाण्याने वेढले आहे. गुरुदासपूरच्या श्री हरगोबिंदपुरा येथे पावसाच्या नाल्याचे पाणी पाहण्यासाठी गेलेली दोन मुले वाहून गेली. होशियारपूरमधील अनेक गावे रिकामी करण्यात आली आहेत.