नवी दिल्ली : दिल्ली, हिमाचल, पंजाबसह देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. दिल्लीत पावसाने ४१ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. १९८२ पासून जुलैमध्ये एकाच दिवसात सर्वाधिक १५३ मिमी पाऊस झाला. देशभरात पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांत लष्कराच्या दोन जवानांसह १६ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, अमरनाथ यात्रा तीन दिवसांनंतर पुन्हा सुरू झाल्याने भाविकांना दिलासा मिळाला. नवी दिल्लीत १९८२ पासून जुलैमध्ये एकाच दिवसात सर्वाधिक १५३ मिमी पाऊस झाला. यापूर्वी २५ जुलै १९८२ रोजी १६९.९ मिमी पावसाची नोंद झाली होती.
पावसामुळे नेमके कुठे काय घडले?दिल्लीत एका ५८ वर्षीय महिलेचा फ्लॅटचे छत कोसळून मृत्यू झाला. उत्तराखंडमध्ये टिहरी गढवाल जिल्ह्यातील मुनी की रेती भागात केदारनाथहून परतणारी एक जीप रविवारी पहाटे गंगेत पडल्याने तीन यात्रेकरू बुडाले. जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात रविवारी एका प्रवासी बसवर दरड कोसळून दोन प्रवासी ठार झाले. पंजाबमध्ये रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले आहे. लुधियानामध्ये माछीवाडाजवळील सेंसोवाल खुर्द गावात अडकलेल्या २२ जणांची सुटका केली.
उत्तर प्रदेशात मुरादाबादमध्ये ढेला नदीचे पाणी १२ गावांपर्यंत पोहोचले आहे. येथे १५ दिवसांत वीज कोसळून ३७ मृत्यू झाले. मुजफ्फरनगरमध्ये रविवारी पहाटे घराचे छत कोसळून महिला आणि तिची ६ वर्षांची मुलगी ठार झाली, तर पती जखमी झाला. राजस्थानमधील सीकर शहरातील एका १७ वर्षीय विद्यार्थ्याचा शनिवारी संध्याकाळी पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून मृत्यू झाला.