रायपूर: छत्तीसगडमधील पत्रकारांनी भाजपा नेत्यांना हेल्मेट घालून प्रश्न विचारले. हातात माईक आणि डोक्यावर हेल्मेट अशा अवतारात पत्रकारांनी भाजपा नेत्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या. भाजपा नेत्यांनी गेल्या आठवड्यात एका पत्रकाराला मारहाण केली होती. त्याचा पत्रकारांनी अनोख्या पद्धतीनं निषेध केला. भाजपा नेत्यांना योग्य तो संदेश देण्यासाठी हेल्मेट घालून भाजपाच्या कार्यक्रमांचं वार्तांकन करत असल्याचं काही पत्रकारांनी सांगितलं. भाजपा नेत्यांनी पुन्हा हल्ला केल्यास हेल्मेट कामी येईल, अशी भावना काहींनी व्यक्त केली. शनिवारी पत्रकार सुमन पांडे यांना भाजपा नेत्यांनी मारहाण केली. 'नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव पत्करावा लागला. या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी भाजपानं बैठक बोलावली होती. त्यामध्ये भाजपा नेत्यांमध्ये हाणामारी झाली. या घटनेचं चित्रीकरण करत असताना भाजपा नेत्यांनी मारहाण केली,' असं पांडे यांनी सांगितलं.
...म्हणून भाजपाच्या कार्यक्रमाला हेल्मेट घालून गेले पत्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 3:57 PM