रायपूर: काही दिवसांपासून काँग्रेस टूलकिटवरून राजकारण तापताना पाहायला मिळत आहे. भाजपकडून काँग्रेसवर टीका केली जात असून, काँग्रेसकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. ट्विटरनेही याप्रकरणी भाष्य केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांना नोटीस बजावून हजर राहण्याचे निर्देश पोलिसांकडून देण्यात आले आहेत. (raipur police sent notice to bjp sambit patra over toolkit issue)
अलीकडेच भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी एक पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस टूलकिटचा वापर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केला होता. यावेळी संबित पात्रा यांनी काँग्रेसवर मोठे आरोप केले. यावरून संबित पात्रा यांच्याविरोधात काँग्रेस नेत्यांनी छत्तीसगडमधील रायपूर पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी संबित पात्रा यांना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली असून, हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
माजी मुख्यमंत्र्यांचा जबाब नोंदवणार!
रायपूर पोलिसांनी टूलकिटप्रकरणी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते रमण सिंह यांना जबाब नोंदवण्यासाठी २४ मे रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. भाजपकडून करण्यात आलेले आरोप काँग्रेसने फेटाळून लावले असून, संबित पात्रा आणि माजी मुख्यमंत्री रमण सिंग यांच्याविरोधात पोलिसांत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी कोरोनावरून सुरू असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसची एक कथिट टूलकिट दाखवली. यावेळी त्यांनी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अयोग्य शब्दांचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे. इंडियन स्ट्रेनला मोदी स्ट्रेन म्हणायचे आहे. कुंभ मेळ्याला सुपर स्प्रेडरप्रमाणे सांगायचे आहे. परंतु ईदला काहीच म्हणायचं नाही, असे पात्रा यांनी कथित टूलकिट दाखवताना म्हटले.