सिलीगुडी - लोकसभेसाठी पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेससोबतच्या जागावाटपावरून विरोधी इंडिया आघाडीत मतभेद निर्माण झाले असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी बंगाल व बंगाली लोकांना देशात सुरू असलेल्या अन्यायाविरुद्ध लढा उभारण्याची हाक दिली.
भारत जोडो न्याय यात्रा उत्तर बंगालमध्ये पोहोचल्यानंतर राहुल एका सभेला संबोधित करताना बोलत होते. तत्पूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांचा पक्ष आगामी लोकसभा निवडणूक राज्यात स्वबळावर लढवेल, अशी घोषणा केली होती. पश्चिम बंगालमधील उत्स्फूर्त स्वागताबद्दल राहुल यांनी कृतज्ञता व्यक्त केली. (वृत्तसंस्था)
ते म्हणाले, “स्वातंत्र्य लढ्यात बंगालने वैचारिक लढ्याचे नेतृत्व केले. सध्याच्या परिस्थितीत द्वेषाविरुद्ध लढण्याचा मार्ग दाखवणे आणि देशाला एकत्र ठेवणे हे बंगाल आणि बंगालींचे कर्तव्य आहे. जर तुम्ही प्रसंगावधान राखून उभे राहिले नाही, तर लोक तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत. हे कोणा व्यक्तीबद्दल नाही तर बंगालने मार्ग दाखवून लढ्याचे नेतृत्व करण्याशी संबंधित आहे.’’ राहुल यांनी कोणत्याही राजकीय घटकाचे थेट नाव घेणे टाळले.