इस्रायलवर हल्ला केल्यानंतर आता कोणत्याही क्षणी इराणवर पलटवार होण्याची शक्यता आहे. यामुळे जगभरातील शेअर बाजारही धडाधड पडले आहेत. असे असताना भारताने तीन युद्धानौका इराणच्या बंदरात पाठवल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. भारतीय नौदलाच्या युद्धनौका अब्बास बंदरात दाखल झाल्या आहेत. इराणच्या सैन्यासोबत या युद्धनौका खाडीत युद्धसराव करणार आहेत.
इराणने भारतीय युद्धनौकांचे अब्बास बंदरावर स्वागत केले. इराणच्या बंदरावर आयएनएस तीर, आयएनएस शार्दुल आणि आसीजीएस वीरा या तीन युद्धनौका आहेत. भारतीय नौदलाने याची माहिती दिली आहे. भारत आणि इराणचे लक्ष समुद्री सहयोगावर असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
मार्चमध्ये इराणची दोन प्रशिक्षण जहाजे मुंबईत आली होती. तसेच फेब्रुवारीमध्ये इराणी नौदलाची युद्धनौका भारताच्या नौदल सरावात सहभागी झाली होती. इराणच्या हल्ल्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी फोनवर चर्चाही केली होती. भारताने इराणच्या चाबहार बंदरातही मोठी गुंतवणूक केली आहे.