नवी दिल्ली - सोशल मीडियावर अनेकजण एकमेकांच्या प्रेमात पडतात. पण आता ऑनलाईन PUBG खेळताना दोन अनोळखी व्यक्ती प्रेमात पडल्याची घटना समोर आली आहे. दोन अनोळखी लोक PUBG खेळताना एकमेकांना ऑनलाईन भेटले. प्रेमात पडले. यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मध्य प्रदेशातील रायसेनमध्ये अशीच एक अजब घटना घडली आहे. ऑनलाईन गेम खेळता खेळता मुलगा, मुलगी एकमेकांच्या संपर्कात आले. दोघांची मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनी लग्न केलं. आता लग्नाला महिना झाला असून दोघांचा संसार अगदी आनंदात सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रायसेनमधील एक तरुण पबजी खेळता खेळता नैनीतालमधील एका तरुणीच्या प्रेमात पडला. जवळपास दोन वर्षे त्यांचे प्रेमसंबंध होते. त्यानंतर तरुणी नैनीतालहून पळाली आणि रायसेनला आली. दोघांनी लग्न केलं. तरुणीचा ठावठिकाणा सापडत नसल्याने नैनितालमध्ये असलेल्या तिच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. नैनीताल पोलीस तरुणीला परत घेऊन जाण्यासाठी रायसेनला परतले. त्यावेळी तरुणीने घरी जाण्यास नकार दिला.
गेम खेळता खेळता प्रेम जडलं
मध्य प्रदेशातील रायसेन शहरातील प्रभाग क्रमांक 11 मध्ये राहत असलेला तरुण दीड वर्षांपूर्वी पबजी खेळता खेळता उत्तराखंडच्या नैनीतालमध्ये राहणाऱ्या शीतलच्या संपर्कात आला. दोघांची मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. Whatsapp चॅटपासून सुरू झालेलं संभाषण व्हिडीओ कॉलपर्यंत पोहोचलं. लग्नाआधी दोघे एकदाच भेटले होते. महिन्याभरापूर्वी त्यांनी भोपाळमध्ये लग्न केलं आणि सोबत राहू लागले.
नैनितालमध्ये बीएससीचा अभ्यास करताना शीतलला पबजी खेळण्याची सवय लागली. गेम खेळता खेळता ती योगेशच्या संपर्कात आली. दोन वर्षे दोघांचे प्रेमसंबंध होते. त्यानंतर शीतल नैनितालहून पळून रायसेनला आली आणि दोघांनी लग्न केलं. कुटुंबियांच्या तक्रारीवरून नैनीताल पोलीस शीतलला नेण्यासाठी आले. मात्र तिने स्वत:च्या मर्जीनं लग्न केलं असल्याने पोलिसांना तिच्याशिवाय परतावं लागलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.