लखनौ : वर्षाला करोडो आणि लाखोंची कमाई असलेल्या मंडळींनी दरमहा ५0 हजार रुपये पेन्शन मिळावी, यासाठी उत्तर प्रदेश सरकारकडे अर्ज केले असून, त्यात काँग्रेसचे खा. राज बब्बर, नादिरा बब्बर, क्रिकेटपटू सुरेश रैना, मोहम्मद कैफ तसेच गायिका मालिनी अवस्थी, गिरिजादेवी, अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी, जिमी शेरगिल आदींचा समावेश आहे. अमिताभ बच्चन यांनी मात्र पेन्शनचा अर्ज भरून पाठविलेला नाही. तसेच खा. जया बच्चन आणि अभिषेक यांनीही उत्तर प्रदेश सरकारच्या पेन्शनसाठी अर्ज केलेला नाही.उत्तर प्रदेश सरकारचे यश भारती पुरस्कार तसेच पद्म पुरस्कार मिळविणाऱ्यांना अखिलेश यादव सरकारने दरमहा ५0 हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णय घेतला. हे पुरस्कार मिळालेल्या ११४ जणांना सरकारतर्फे यासंबंधीचे अर्ज पाठविण्यात आले. बच्चन कुटुंबातील तिघे आणि अन्य तीन जण वगळता इतर सर्व म्हणजे १0८ कलाकार, खेळाडू आदींनी पेन्शनसाठीचे अर्ज भरून सरकारकडे पाठविले आहेत. त्यामुळे निकषानुसार या सर्वांना आता दरमहा तब्बल ५0 हजार रुपये पेन्शन मिळू शकेल, असे दिसते. कलाकार, खेळाडू, गायक, गायिका यांचा सन्मान म्हणून हे पेन्शन देण्यात येणार असले तरी लाखो आणि करोडो रुपये कमावणाऱ्यांनी त्यासाठी अर्ज केल्याने सारेच चकित झाले आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकी याचेही हल्ली सतत चित्रपट येत आहेत. त्यामुळे या आणि अशा मंडळींना पेन्शन देण्याऐवजी राज्यातील वयोवृद्ध, गरीब, विधवा यांना पेन्शन देणे आवश्यक आहे, अशी चर्चा उत्तर प्रदेशात सुरू आहे. या मंडळींनी आतापर्यंत इतका पैसा कमावला आहे की, यांना पेन्शनची गरजही नाही, असे तेथील लोकांचे म्हणणे आहे. केवळ उत्तर प्रदेशातील पुरस्कार विजेत्यांसाठी पेन्शन योजना असली तरी हा पैसा या मंडळींना देण्याऐवजी अन्य वृद्ध कलाकारांना द्यावा, अशी मागणी उत्तर प्रदेशात होत आहे. (वृत्तसंस्था)
राज बब्बर, सुरेश रैना यांना हवी आहे ५0 हजार रुपये पेन्शन
By admin | Published: February 06, 2016 2:49 AM