पंजाबमध्येकाँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आमदार राज कुमार चब्बेवाल यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यासोबतच त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीत आप राज कुमार चब्बेवाल यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे.
राज कुमार चब्बेवाल यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केल्याने ते लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यांना होशियारपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते. आम आदमी पक्षाने गुरुवारीच आठ लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली.
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी राज कुमार चब्बेवाल यांच्या पक्षाचा राजीनामा दिल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. "कुछ तो रही होंगी उनकी मजबूरियां, यूहीं कोई बेवफा नहीं होता. किरदार का मुश्किल वक्त में ही पता लगता है" असं ते आपल्या शायराना अंदाजात म्हणाले आहेत.
यासोबतच नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले की, लोक जर पक्ष सोडत असतील तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वडिंग यांचा काय दोष आहे. हे लोक पदासाठी इकडे तिकडे जात आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंग पक्षात नसतील तर त्यांच्या पत्नी परनीत कौर यांचं काय आहे. यासोबतच त्यांनी पुन्हा एकदा निवडणूक लढवणार नसल्याचं सांगितलं.
याआधी फतेहगढ़ साहिबचे माजी आमदार गुरप्रीत सिंग जेपी यांनीही काही दिवसांपूर्वी काँग्रेस सोडून आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. 9 मार्च रोजी त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला आणि 14 मार्च रोजी फतेहगढ़ साहिबमधून लोकसभेचं तिकीट मिळवलं.