MNS Chief Raj Thackeray Ayodhya Tour: अयोध्या: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा 5 जून रोजी होणारा अयोध्या (Ayodhya) दौरा स्थगित करण्यात आला आहे. स्वतः राज ठाकरे यांनी ट्विटरवरुन याची घोषणा केली आहे. प्रकृती अस्वस्थामुळे दौरा काही काळासाठी स्थगित केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, राज ठाकरेंच्या या घोषणेनंतर उत्तर प्रदेशात त्यांना विरोध करणारे भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली होती, त्या दुखण्याने पुन्हा डोकं वर काढल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी अयोध्या दौरा स्थगित केल्याचे सांगितले. याविषयी येत्या रविवारी पुण्यात होणाऱ्या सभेत ते सविस्तर माहिती देणार आहेत. दरम्यान, तिकडे उत्तर प्रदेशात राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध करणारे खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्याविरोधात शरयू स्नानाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
शरयू स्नान होणारच'राज ठाकरे यांचा दौरा रद्द झाला असला तरी माझा शरयू स्नानाचा कार्यक्रम 5 जून रोजी होणारच आहे. आम्ही त्यादिवशी साधू-संतांच्या उपस्थितीत शरयू स्नान करू. आता राज ठाकरे अयोध्येत येणार नसल्याने आम्ही आणखी उत्साहात कार्यक्रम साजरा करू. आम्ही 5 जूनला आमचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा वाढदिवसही धुमधडाक्यात साजरा करू,' असे बृजभूषण सिंह यांनी सांगितले आहे.
'आम्ही मदत केली असती'- संजय राऊतांचा टोलाराज ठाकरेंचा दौरा रद्द झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली. 'कुणाचा अयोध्या दौरा का रद्द झाला याबाबत आम्हाला काही माहित नाही. पण तुमचा वापर केला जातोय हे आतातरी लक्षात घ्या. राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्याबाबत आमची मदत मागितली असती तर नक्कीच आम्ही केली असती', असा टोला राऊतांनी लगावला. तसेच, आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा नियोजित वेळेनुसारच होणार असल्याचे त्यांनी म्हटले.