लखनौ - मनसेप्रमुखराज ठाकरे हे 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमधील भाजप नेते आणि खासदार बृजभूषणसिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला आक्षेप घेत थेट विरोध केला आहे. जोपर्यंत राज ठाकरे उत्तर प्रदेशची माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. विशेष म्हणजे ते आपल्या विधानावर आजही ठाम आहेत. 'मी घुसू देणार नाही म्हटलंय, तर खरंच घुसू देणार नाही', असा सज्जड दमच त्यांनी दिला आहे.
राज ठाकरेंनी माफी मागितल्याशिवाय त्यांना उत्तर प्रदेशात पाय देखील ठेऊ देणार नसल्याचं बृजभूषण सिंह यांनी ठामपणे सांगितलं आहे. त्यामुळे, मनसे विरुद्ध भाजप खासदार असा सामना दिसून येत आहे. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यापूर्वी त्यांची पुण्यात सभा होत आहे. त्यामुळे, या सभेत बोलताना राज अयोध्येतील विरोधाबद्द काही बोलतील का, याचीही उत्सुकता अनेकांना लागली आहे. तसेच, राजदौऱ्याच्या पार्श्वभूमीवर येत्या ५ जून रोजी नेमकं अयोध्येत काय घडणार? याचीही चर्चा होत आहे.
महाराष्ट्रातील भाजपच्या बड्या नेत्यांनी खासदार बृजभूषण यांच्या विधानाशी असहमती दर्शवली आहे. मात्र, खासदार सिंह यांचा विरोध वाढतच असून ते मोठ्या प्रमाणात लोकांनाही एकत्र करत आहेत. मी जर एक आवाज दिला, तर राज ठाकरेच काय, त्यांच्या खानदानातील एकही माणूस उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये येऊ शकणार नाही. सध्या ते मुस्लिमांना भडकवत आहेत. त्यामुळेच, मोठ्या संख्येनं मला मुस्लीमांचं समर्थन मिळत आहे. मुस्लीम बांधव दररोज मला येऊन भेटत आहेत. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातीलही मुसलमान मला समर्थन करत आहेत, असेही त्यांनी सांगितले. ''मी म्हणतो राज ठाकरे उंदीर आहे. ते बिळात राहातात. त्या बिळातून बाहेर येत नाही. आत्तापर्यंत ते बाहेर आले नाही. पहिल्यांदा ते आले आहेत. त्यामुळे मी विरोध करत आहे. मी ठरवलं आहे की ५ तारखेला त्यांना उत्तर प्रदेशच्या धरतीवर घुसू देणार नाही. मी म्हटलंय म्हणजे घुसू देणारच नाही,'' अशा शब्दात त्यांनी इशाराही दिला. तसेच, हे योग्य आहे की अयोग्य ते येणारा काळच ठरवेल', असेही त्यांनी म्हटलंय.
शिवाजी महाराजांना आदर्श मानतो
देशातला कोणताही नागरिक महाराष्ट्रात जातो, तेव्हा तो दुय्यम दर्जाचा नागरिक बनून राहातो. तो घाबरून तिथे राहातो. मी महाराष्ट्राची भूमी, महाराष्ट्राच्या लोकांना प्रणाम करतो. छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही आदर्श मानतो. माझं कुणाशीही वैर नाही, हा लढा सत्ता मिळवण्यासाठी किंवा सत्ता परिवर्तनासाठी नाही. माझी लढाई आमच्यावरील अन्यायाविरुद्ध आहे, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितले.