नवी दिल्ली - Raj Thackeray at Delhi ( Marathi News ) महाराष्ट्रातील राजकारणात आणखी एकदा मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या दिल्लीत असून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांची बैठक होणार आहे. मनसे महायुतीतला घटक पक्ष होणार हे आता जवळपास निश्चित मानलं जात आहे.
राज ठाकरे हे सोमवारी रात्री उशिरा दिल्लीत पोहचले. त्यानंतर मंगळवारी सकाळी १२.३० वाजता राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या बैठकीची वेळ निश्चित केली होती. राज ठाकरेंचा मनसे पक्ष भाजपासोबत युतीत आल्याने एनडीएला महाराष्ट्रात आणखी एक मित्र सापडला आहे. मनसे भाजपा युतीत नेमक्या किती जागा लोकसभेसाठी सोडल्या जाणार अशी चर्चा आहेत. त्यात दक्षिण मुंबई आणि आणखी एक मतदारसंघ अशा २ जागा राज ठाकरेंना सोडल्या जाऊ शकतात असं बोललं जाते.
दिल्लीच्या ताज मानसिंग हॉटेलमध्ये राज ठाकरे मुक्कामी होते. याठिकाणी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. एका राजकीय पक्षाचे अध्यक्ष दिल्लीत आलेले असताना त्यांचा योग्य सन्मान व्हावा यासाठीही भाजपा विनोद तावडे यांना राज ठाकरेंना भेटण्यासाठी पाठवले आणि तिथूनच तावडे, राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे एका वाहनाने केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या भेटीला गेले. शाह आणि राज ठाकरे यांच्या भेटीत नेमकं मनसेला काय मिळणार हे पाहणे गरजेचे आहे.
तत्पूर्वी मनसे राज ठाकरेंच्या दिल्लीवारी संजय राऊतांनी टीकास्त्र सोडले आहे. राज ठाकरे महायुतीत गेल्याने मविआवर काही फरक पडणार नाही. दिल्लीत जाणे हा राज ठाकरेंचा अधिकार आहे. बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या संदर्भात महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्या मोदी शाहांना मदत करू इच्छित असतील तर अशा नेत्यांची, पक्षांची राज्याच्या इतिहासात भूमिका महाराष्ट्र द्रोही अशी लिहिली जाईल. महाराष्ट्रावर, मराठी माणसांवर प्रेम आहे. ते असा निर्णय घेणार नाहीत असा निशाणा राऊतांनी राज ठाकरेंवर साधला.