नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणासाठी निमंत्रण देण्यावरून नाराज झालेले महापौर अशोक मुर्तडक आणि त्यानंतर राज ठाकरे यांना निमंत्रण न दिल्याची टीका या पार्श्वभूमीवर श्री गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाच्या वतीने शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यात येणार असून, मंगळवारी होणार्या ध्वजारोहण सोहळ्याचे निमंत्रण देण्यात येणार आहे.सिंहस्थ कुंभमेळ्याचा प्रारंभ होणार त्या दिवशी म्हणजेच १४ जुलैस सकाळी ६.१६ वाजता रामकुंडावर ध्वजारोहण करण्यात येणार आहे. या पारंपरिक ध्वजारोहण सोहळ्याने सिंहस्थ प्रारंभ झाल्याचा संदेश दिला जात असतो. तथापि, यंदा ध्वजारोहण सोहळाच वादात सापडला आहे. पंचकोटी पुरोहित संघाने अध्यक्ष सतीश शुक्ल यांच्या अध्यक्षतेखाली काही लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मुंबई आणि दिल्ली गाठली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ध्वजारोहण सोहळ्याचे निमंत्रण दिले. निमंत्रण देताना शहराचे प्रथम नागरिक अशोक मुर्तडक यांना समवेत न नेल्याने मनसेने अगोदरच नाराजी जाहीर केली होती. त्यानंतर अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज याच कारणावरून रुष्ट झाले आणि आता तर ते पुरोहित संघाचे ध्वजारोहण मानण्यास तयार नाहीत. त्यातच पुरोहित संघाने अनेक केंद्रीय मंत्र्यांना निमंत्रण देताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना निमंत्रण दिलेले नाही. त्यामुळे मनसेच्या नाराजीत भर पडली आहे. त्यामुळे शनिवारी नाशिक दौर्यावर येणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटणार असून, त्यांना पुरोहित संघाच्या ध्वजारोहण सोहळ्याचे निमंत्रण देणार आहेत. मनसे अध्यक्ष ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्यात येत असून, त्यांचा निरोप झाल्यानंतर लगेचच पुरोहित संघाचे पदाधिकारी हे निमंत्रण देणार आहेत. ध्वजारोहण सोहळ्यास अनेक मंत्र्यांना निमंत्रित करण्यात आले असले तरी आत्तापर्यंत केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, वित्तमंत्री सुधीर मुनगंीवार आणि खासदार रामदास आठवले यांनी निमंत्रण स्वीकृत केल्याचे कळविले आहे. मात्र केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह हे ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याचे पुरोहित संघाचे म्हणणे आहे.
पुरोहित संघ राज ठाकरे यांना देणार निमंत्रण ध्वजारोहण : राजी-नाराजी नाट्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
By admin | Published: July 10, 2015 9:26 PM