नवी दिल्ली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सोमवारी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. ईव्हीएमवरील संशय, पुढील निवडणुका मतपत्रिकांद्वारे घेणे व लोकसभा निवडणुकीचा निकाल या विषयांवर सोनिया गांधी यांच्याशी आपण चर्चा केली, असे राज ठाकरे यांनी नंतर पत्रकारांना सांगितले. ते म्हणाले की, ईव्हीएमबाबत मी जे मुद्दे मांडले, त्यांना सोनिया गांधी यांनी दुजोरा दिला. देशाला मोठ्या जन आंदोलनाची गरज असून, त्यासाठी विरोधी बाकांवरील सर्व राजकीय पक्षांना एकत्र यावे लागेल, असेही मी त्यांना सांगितले, असे नमूद करून राज म्हणाले की, शरद पवार यांच्याशीही ईव्हीएमसंदर्भातच आपली चर्चा झाली होती.
विधानसभा निवडणुकीत एकत्र?महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेने एकत्र लढावे, या संदर्भातही राज व सोनिया गांधी यांची चर्चा झाल्याचे कळते. अर्ध्या तासाच्या या भेटीबाबत अनेक अंदाजही बांधले जात आहेत.
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गेल्या काही काळापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे यांनी स्वत:च्या पक्षाचे उमेदवार न देता भाजपाविरोधात प्रचार केला होता. त्यामुळे राज्यात मोदींविरोधात वातावरण निर्मिती झाली होती. पण प्रत्यक्ष निकालांमध्ये त्याचा फारसा परिणाम दिसून आला नव्हता. दरम्यान, आज दिल्ली दौऱ्यावर गेलेल्या राज ठाकरे यांनी सोनिया गांधींच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत नव्या समीकरणे उदयास येण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेला सोबत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या प्रयत्नांना काँग्रेसने विरोध केला होता. मात्र आता राज ठाकरे हे थेट सोनिया गांधींच्याच भेटीला गेल्याने मनसेला महाराष्ट्रातील महाआघाडीत सामावून घेण्याची प्रक्रिया नव्याने सुरू होण्याची चर्चा नव्याने सुरू झाली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर गेले असून, तेथे त्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेऊन ईव्हीएम हॅक होण्याची शक्यता असल्यानं आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घ्या, अशी मागणी केली होती. दरम्यान, केवळ औपचारिकता म्हणून निवडणूक आयोगाला पत्र दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहता त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणे मूर्खपणाचे ठरेल, असेही ते म्हणाले होते.