ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - गेली २० वर्षे देशोदेशीच्या पोलिसांच्या हातावर तुरी देणारा ५५ वर्षांचा मोस्ट वाँटेड गँगस्टर छोटा राजन माझ्यामुळेच जेरबंद झाला असा दावा राजनचा जुना शत्रू शकील शेख उर्फ छोटा शकीलने केला आहे. मात्र आपण त्याच्या अटकमुळे समाधानी नाही, असेही शकीलने म्हटल्याचे वृत्त 'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिले आहे.
१९९३ च्या बॉम्बस्फोटानंतर दाऊद आणि छोटा राजन वेगळे झाल्यानंतर छोटा शकीलने अनेक वेळा राजनला संपवण्याचा प्रयत्न केला होता, तो सतत त्याच्या मागे लागला होता. 'गेल्या आठवड्यात फिजीमध्ये माझी माणस त्याच्या मागावरच होती आणि तो लपून बसलेल्या ठिकाणीच माझ्या माणसांनी त्याला अडकवून ठेवले होते. तिथे कोंडी झाल्यामुळेच राजन तेथून पळाला आणि त्याला इंडोनेशियाला जाणं भाग पडलं, जिथे त्याला अटक करण्यात आली. मात्र त्याच्या अटकेमुळे डी कंपनी खुश नाही आणि आमचं त्याच्याशी असलेलं शत्रुत्वही संपलेलं नाही. मी जोपर्यंत त्याला संपवत नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही,' असे शकीलने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले.
इंडोनेशियाने राजनला मुक्त केले किंवा भारताकडे सोपवले तरी आपल्याला काही फरक पडत नसल्याचे शकीलने म्हटले आहे. 'आमच्या ( डी कंपनी) विरोधात कारवाया करण्यासाठी राजनची मदत घेणा-या भारत सरकारवर आमचा बिलकूल विश्वास नाही. राजनचे भारतात हस्तांतर झाल्यावरही त्याच्याविरोधात खटला चालवून त्याला दोषी ठरवण्यात येईलच याची काय खात्री? त्याला अटक झाल्याने आम्हाला काहीच फरक पडत नाही, शत्रूला (छोटा राजन) खतम करणं हेच आमच धोरण आहे. तो ( छोटा राजन) कुठेही असला तरी मी त्याला बिलकूल सोडणार नाही' असेही छोटा शकीलने म्हले आहे.
१९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर दाऊद आणइ छोटा राजनचे फाटले आणि ते दोघेही वेगळे झाले, तेव्हापासूनच छोटा शकील राजनला संपवण्याच्या प्रयत्नात आहे. शकीलचा हस्तक मुन्ना जिंगडा आणि इतर दोघांनी मिळून २००० साली छोटा राजनवर बँकॉकमध्ये प्राणघातक हल्ला केला होता, ज्यामुळे राजन अतिशय गंभीर जखमी होऊन रुग्णालयात दाखल झाला होता. मात्र काही काळाने तो आपल्या साथीदारांच्या मदतीने पळून जाण्यात यशस्वी ठरला आणि शकीलने पुन्हा त्याचा पाठलाग सुरू केला.