नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन पूर्णपणे भारतीय मानसिकतेचे नाहीत आणि त्यांनी मुद्दाम भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे, असा आरोप करीत भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून त्यांना त्वरित हटवण्याची मागणी केली आहे.राजन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्य अर्थतज्ज्ञ आहेत. गेल्या आठवड्यात संसदेचे अधिवेशन समाप्त झाल्यानंतर स्वामी यांनी राजन यांच्याविरुद्ध आरोप केले होते. आता त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून राजन यांची सेवा त्वरित थांबविण्याची मागणी केली. भारतीय अर्थव्यवस्था मुद्दाम उद्ध्वस्त करण्याच्या राजन यांच्या प्रयत्नामुळे मी स्तब्ध आहे. त्यामुळे मी असा सल्ला देत आहे, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.>व्याजदराचा चढ-उतार अन् टीकेचे धनी राजन यांना मुदतवाढ न मिळाल्यास सप्टेंबरमध्ये त्यांचा कार्यकाळ संपुष्टात येईल. पाच वर्षांचा कार्यकाळ न मिळालेले ते १९९२नंतरचे पहिले गव्हर्नर ठरतील. यापूर्वी डी. सुब्बाराव (२00८ ते २0१३), वाय. डी. रेड्डी (२00३ ते २00८), बिमल जालान (१९९७ ते २00३) आणि सी. रंगराजन (१९९२-१९९७) यांचा गव्हर्नरपदाचा कालावधी पाच वर्षे होता.राजन शिकागोच्या बूथ स्कूल आॅफ बिझनेसमध्ये वित्त विभागाचे प्रोफेसर आहेत. सध्या ते सुटीवर आहेत. त्यांनी सप्टेंबर २0१३मध्ये गव्हर्नरपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर रेपोरेट हळूहळू वाढवित ७.२५ टक्क्यांवरून ८ टक्के केला. संपूर्ण २0१४मध्ये हाच दर कायम राहिला. व्याजदर कमी करावेत, अशी विनंती वित्तमंत्रालयाने वारंवार करूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून चलनवाढीचे कारण देऊन हेच दर कायम ठेवले. जानेवारी २0१५मध्ये त्यांनी व्याजदर घटविण्यास प्रारंभ केला. तेव्हापासून आतापर्यंत व्याज दर १.५0 टक्क्यांनी घटवून ६.५0 टक्क्यांवर आणला आहे.>भारतीय अर्थव्यवस्था बिघडविणारे चलनवाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी व्याज दर वाढविण्याची राजन यांची कृती विनाशकारी होती. त्याचबरोबर गेल्या २ वर्षांत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे थकीत कर्ज (एनपीए) दुप्पट होऊन ३.५ लाख कोटी रुपये झाले, असेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे. केंद्रात असलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारने राजन यांची तीन वर्षांसाठी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली होती. त्यांचा कार्यकाळ वाढविलाही जाऊ शकतो.स्वामी यांनी म्हटले आहे की, राजन यांचे विविध पैलू पाहता ते भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्याऐवजी ती बिघडविणारे वाटतात. ते या देशात अमेरिकी सरकारच्या ग्रीनकार्डवर आहेत. त्यामुळे बौद्धिकदृष्ट्या भारतीय नाहीत. तसे नसते, तर दरवर्षी अमेरिकेचा दौरा करून रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून त्यांनी आपल्या ग्रीनकार्डचे नूतनीकरण का करून घेतले असते? ग्रीनकार्ड कायम राहावे, यासाठीच ते तसे करतात.
अर्थव्यवस्थेसाठी राजन घातक
By admin | Published: May 18, 2016 4:09 AM