मुंबई : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अत्यंत विश्वासू अशी ओळख असणाऱ्या माजी खासदार रजनी पाटील यांना पुन्हा एकदा राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतल्याची माहिती आहे. उद्या अर्ज दाखल करण्याचा दिवस आहे. विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती.
उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे. सोनिया गांधी यांच्या किचन कॅबिनेट मधील एक नेत्या अशीही त्यांची ओळख आहे. युवा नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक नावे चर्चेत होती. मात्र रजनी पाटील यांना संधी देऊन काँग्रेसने एका महिला नेत्याला संधी दिली आहे. रजनी पाटील ह्या वसंतदादा पाटील यांच्या मानसकन्या असून मूळच्या त्या सांगली जिल्ह्यातल्या. पुढे विवाहानंतर त्या मराठवाड्यात स्थाईक झाल्या. माजी क्रीडा राज्यमंत्री अशोक पाटील यांच्या त्या पत्नी. बीडमधून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती.
राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची अंतिम तारीख २१ सप्टेंबर आहे. राज्यसभेच्या सात जागांसाठी येत्या ४ ऑक्टोबरला निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या एका जागेसाठी उमेदवारी मिळावी म्हणून काँग्रेस पक्षातील सहा नेत्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले होते. त्यामध्ये मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण, गुलाम नबी आझाद, मिलिंद देवरा, उत्तमसिंह पवार, अनंत गाडगीळ यांचा समावेश होता. काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. महाराष्ट्र व अन्य राज्यांतील राज्यसभा जागा जिंकाव्या, असे प्रयत्न भाजपनेही सुरू केले आहेत.