ऑनलाईन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - दिल्लीतील सीबीआय न्यायालयाने गुरुवारी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या न्यायालयीन कोठडीत १५ डिसेंबरपर्यंत वाढ केली.
बनावट पासपोर्ट प्रकरणात सीबीआयने त्याला अटक केली आहे. राजनच्या जीवाला धोका असल्याने या खटल्याची इन कॅमेरा सुनावणी सुरु आहे. तिहार तुरुंगातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे राजनला विशेष सीबीआय न्यायाधीश विनोद कुमार यांच्यासमोर हजर करण्यात आले.
सीबीआयने आधीच याचिका दाखल करुन राजनच्या जीवाला प्रतिस्पर्धी टोळयांकडून धोका असल्यामुळे प्रत्यक्ष हजर करणे शक्य नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते.
२७ वर्ष फरार असलेल्या राजनला बाली येथून आणल्यानंतर उच्चस्तरीय सुरक्षा व्यवस्था असलेल्या तिहार तुरुंगात ठेवण्यात आले आहे.
राजनवर हत्या, खंडणी आणि तस्करी प्रकरणात मुंबई, दिल्लीमध्ये ७० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. २५ ऑक्टोंबरला त्याला बालीमध्ये अटक झाली होती.