नवी दिल्ली : मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीच्या(बसपा) एका आमदाराने आपल्याच पार्टीवर सनसनीत आरोप केले आहेत.बहुजन समाज पार्टीत पैसे घेऊन तिकीट दिले जाते. जर एखादा उमेदवार जास्त पैसे देत असेल तर आधीच्या उमेदवाराचे तिकिट कापले जाते, असे राजस्थान विधानसभेत बहुजन समाज पार्टीचे आमदार राजेंद्र गुढा यांनी सांगितले आहे.
राजेंद्र गुढा यांचा व्हिडीओ न्यूज एजन्सी एएनआयने पोस्ट केला आहे. राजेंद्र गुढा हे उदयपुरवाटी मतदारसंघातील बहुजन समाज पार्टीचे आमदार आहेत. या व्हिडिओत राजेंद्र गुढा यांनी सांगितले की, 'आमच्या बहुजन समाज पार्टीत पैसे घेऊन तिकीट दिले जाते. जर कोणी जास्त पैसे देत असेल तर पहिल्याचे तिकीट कापून त्याला दिले जाते. तिसरा कोणीतरी जास्त पैसे देत असेल तर आधीच्या दोघांचेही तिकीट कापले जाते.'
याचबरोबर, पैशांमुळे निवडणुका प्रभावित होत आहेत. गरिब जनता निवडणुका लढू शकत नाहीत. पक्षांमध्ये तिकिटासाठी पैशांची देवाण-घेवाण होत असते. आमच्या पार्टीत सुद्धा होत असते, असेही राजेंद्र गुढा यांनी सांगितले.