मशीदींवरील भोंग्यांवरून महाराष्ट्रातील राजकारण तापलेले असताना काँग्रेसशासित राजस्थानमधून महत्वाची बातमी आली आहे. अजमेरच्या प्रशासनाने सर्व सार्वजनिक आणि धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरच्या वापरावर बंदी आणली आहे. हा आदेश ७ एप्रिलपासून लागू झाला आहे.
अजमेर प्रशासनाने याला ध्वनीप्रदुषणाचे कारण दिले आहे. याचबरोबर सर्व धार्मिक झेंड्यांवर देखील बंदी घातली आहे. या निर्णयामागे अजान वादाची पार्श्वभूमी असल्याचेही सांगितले जात आहे. आदेशानुसार कोणताही व्यक्ती किंवा समुह किंवा लोक प्रतिनिधी कोणत्याही प्रकारच्या धार्मिक किंवा अन्य समारंभामध्ये डीजेचा वापर परवानगीशिवाय करणार नाही. जर ध्वनीक्षेपकाचा वापर करायचा असेल तर त्यासाठी एसडीएमकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. याचबरोबर रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत ही परवानगी दिली जाणार नाही.
परवानगी मिळल्यानंतर ध्वनी प्रदूषणाचा स्तर कायद्यानुसार निर्धारित स्तरापेक्षा जास्त असता नये, अशा अटी घालण्यात आल्या आहेत. याचबरोबर अजमेरमध्ये धार्मिक झेंडे आणि अन्य धार्मिक प्रतिकांवरही बंदी घालण्यात आली आहे. अजमेरमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. एसपींकडून हे आदेश जारी करण्यात आले आहेत. याद्वारे खासगी संपत्तीवरही धार्मिक झेंडा लावता येणार नाहीय.
ही बंदी एका महिन्यासाठी लागू करण्यात आली आहे.