नागपूर : राजस्थानात भाजपाच्या विरोधात जनमत आहे. वसुंधरा राजे सरकार सत्तेतून जाणार हे अटळ आहे. लवकरच भाजपामध्ये मोठी फूट पडू शकते. तेथील २२ आमदार काँग्रेसच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट अ. भा. काँग्रेस समितीचे महासचिव व राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे यांनी पत्रकारांशी बोलताना शनिवारी केला.पांडे यांची अ. भा. काँग्रेस कार्यसमितीमध्ये नियुक्ती झाल्यानंतर ते नागपुरात आल्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. पांडे म्हणाले, राजस्थानमध्ये साडेचार वर्षात लोकसभेच्या दोन व विधानसभेच्या सहा जागांवर पोटनिवडणूक झाली. यापैकी दोन्ही लोकसभा व चार विधानसभेच्या जागा काँग्रेसने सहज जिंकल्या. येत्या निवडणुकीत काँग्रेस सत्तेवर तर भाजपा भुईसपाट झालेली दिसेल.
‘आघाडी’बाबत प्रदेशला अहवाल मागितला२०० जागा स्वबळावर लढण्याची काँग्रेसची तयारी पूर्ण झाली आहे. पण राष्ट्रीय स्तरावर कुणाशी आघाडी करण्याचा निर्णय झाला तर त्याला प्रदेश काँग्रेसही सहकार्य करेल. भाजपा विरोधी विचारांच्या पक्षांनी एकत्र यावे, अशी आपली भावना आहे. मात्र, वस्तुस्थिती काय आहे, याचा अहवाल आपण५ आॅगस्टपर्यंत प्रदेश काँग्रेसला मागितला आहे, असेही पांडे यानी सांगितले.
नागपुरातून लढणार नाही : नागपुरातून लोकसभेची निवडणूक लढण्यास आपण इच्छुक नाही. आपल्यावर पक्षाने राजस्थानची जबाबदारी सोपविली आहे. ती पूर्ण ताकदीने पार पाडू. नागपुरात पक्षाकडे अनेक सक्षम चेहरे आहेत, असेही त्यांनी सांगितले.