नवी दिल्ली : दिल्लीतील बुरारी मृत्युकांडाबाबत नवनवीन माहिती समोर येत असल्याने या प्रकरणातील गूढ दिवसेंदिवस वाढत आहे. मोक्षप्राप्ती होईल या अंधश्रद्धेतून भाटिया कुटुंबाने स्वत:चा अंत केल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशा प्रकारची एक धक्कादायक घटना ही याआधीही पाच वर्षांपूर्वी राजस्थानमधील सवाई माधोपूरमध्ये घडल्याची माहिती आता समोर आली आहे. एका हिंदी वृत्त संकेतस्थळाने याबाबतचे वृत्त दिले आहे.
दिल्लीतील बुरारीमध्ये 30 जून 2018 रोजी झालेल्या 11 जणांच्या सामूहिक आत्महत्येने एकच खळबळ उडाली होती. याच्या पाच वर्षांआधी म्हणजेच 26 मार्च 2013 रोजी राजस्थानमध्ये अशीच एक घटना घडली होती. माधोपूरमधील कांचन सिंह यांना भगवान शंकरांना भेटण्याची खूप इच्छा होती. मात्र शंकर त्यांना भेटण्यासाठी येत नसल्याने त्यांनी स्वत: देवाकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयात कुटुंबातील इतर आठ सदस्यही सहभागी झाले होते.
कांचन सिंह यांचं कुटुंबीय हे भगवान शंकराचे उपासक होते. ते दररोज नित्यनेमाने त्यांची पूजा करत असत. मात्र देव भेटायला येत नसल्याने त्यांनी त्याला भेटण्यासाठी विषमिश्रित लाडू खाऊन आत्महत्येचा निर्णय घेतला. घरातील सदस्यांचा यामुळे मृत्यू होत असल्याचं पाहून त्यांच्यापैकीच एका महिलेने या संपूर्ण प्रकाराची शेजाऱ्यांना माहिती दिली. उपचारासाठी घरातील सदस्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान पाच जणांचा मृत्यू झाला.