राजस्थान : अजय माकन यांच्या अहवालात बंडखोरांवर कारवाईची शिफारस, प्रदेशाध्यक्षांची गच्छंती शक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 06:52 AM2022-09-28T06:52:31+5:302022-09-28T06:53:05+5:30
काँग्रेस अध्यक्षांना पाठविला अहवाल.
आदेश रावल
नवी दिल्ली : राजस्थानचे सरचिटणीस प्रभारी अजय माकन यांनी मंगळवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना अहवाल पाठविला आहे. अजय माकन आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या अहवालात बंडखोरांविरुद्ध कारवाई करण्याची शिफारस
केली आहे.
काँग्रेस अध्यक्षही अशोक गहलोत यांच्यावर नाराज आहेत. दोन्ही निरीक्षकांनी सांगितले की, शांती धारीवाल, महेश जोशी आणि प्रताप सिंह खाचरियावास यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई व्हायला हवी. तसेच, राजस्थानचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांना हटविण्याची शिफारसही करण्यात आली आहे. डोटासरा हे गहलोत यांचे निकटवर्तीय समजले जातात.
सूत्रांनी सांगितले की, काँग्रेस नेतृत्व लवकरच या नेत्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस जारी करू शकते. नोटिसीमध्ये विचारणा करण्यात येईल की, विधिमंडळ पक्षाची बैठक बोलविण्यात आली तेव्हा त्याचवेळी दुसरी बैठक का बोलविण्यात आली. आमदारांना का भ्रमित करण्यात आले. दरम्यान, सचिन पायलट हे जयपूरहून दिल्लीला दाखल झाले आहेत. असे सांगण्यात येत आहे की, सचिन पायलट हे सोनिया गांधी यांच्यासोबत चर्चा करतील.
२० आमदार गेहलाेत यांना भेटले
राजस्थानच्या २० आमदारांनी अशाेक गेहलाेत यांची मुख्यमंत्री निवासस्थानी पुन्हा भेट घेतली. त्यात काही मंत्र्यांचाही समावेश आहे. सध्याच्या राजकीय संकटाशी या भेटीचा संबंध जाेडण्यात येत आहे. पक्षाकडून काेणतीही नाेटीस मिळाल्यास उत्तर देण्याची तयारी आमदारांची आहे.
आम्ही एकनिष्ठ नसतो, तर सरकार पडले असते : जोशी
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या समर्थकांनी वेगळी बैठक घेण्याला शिस्तभंग म्हटले जात आहे. यावर सरकारचे मुख्य प्रतोद डॉ. महेश जोशी यांनी म्हटले आहे की, आम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहोत. जर आम्ही एकनिष्ठ राहिलो नसतो तर राज्यातील काँग्रेस सरकार केव्हाच पडले असते.
ए. के. एंटाेनी यांना तातडीने केले पाचारण
काँग्रेसच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष ए. के. एंटाेनी यांना दिल्लीत तातडीने बाेलाविण्यात आले आहे. राजस्थानातील घटनाक्रमानंतर अजय माकन यांनी दिलेल्या अहवालावर कारवाई करण्याबाबत एंटाेनी यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.