देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान अनेकांनी नोकरी गमावली, लॉकडाऊनमुळे काहींचे व्यवसाय ठप्प झाले. पण असं असताना आता एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने कोरोनामुळे नोकरी गमावली पण हार नाही मानली. राजस्थानच्या अजमेरमधील रसूलपुरा गावात राहणाऱ्या रझा मोहम्मदने आपल्या मेहनतीच्या जोरावर यश मिळवलं आहे. तो आपल्या गावातील एका शाळेत शिक्षक म्हणून काम करत होता.
कोरोना काळात शाळा बंद करण्यात आल्याने त्याची नोकरीच गेली. शाळा बंद झाल्यावर रझा मोहम्मदने दुसरा काहीतरी रोजगार मिळावा, हाताला काहीतरी काम मिळावं म्हणून खूप धडपड केली. त्याच्याकडे थोडी जमीन होती. पण त्यातून नफा होत नव्हता. याच दरम्यान एका व्यक्तीने त्याला मोत्यांची शेती करण्याचा सल्ला दिला. पण यासाठी तो उत्सुक नव्हता. या शेतीबाबत त्याला अजिबातच माहिती नव्हती.
राजस्थानच्या किशनगडचे नरेंद्र गरवा हे मोठ्या प्रमाणात मोत्यांची शेती करतात. पण जेव्हा यातून मिळणाऱ्या नफ्याबद्दल माहिती झाली. तेव्हा रझा मोहम्मदलाही याबाबत उत्सुकता वाटली. त्याने सर्वात आधी ट्रेनिंग घेतलं. यानंतर 10 बाय 25 या आकाराचं एक तलाव करून मोत्यांची शेती सुरू करण्यात आली. यासाठी सुरुवातीला त्याला 60 ते 70 हजार रुपये खर्च आला. त्यानंतर नफा होतो.
रझा मोहम्मदने मोत्यांची शेती करण्यासाठी 18 महिन्यांचा वेळ लागत असल्याचं म्हटलं आहे. तसेच ज्या तलावात ही शेती केली जाते त्याच्या पीएच स्तर सात ते आठ दरम्यान असणं गरजेचं आहे. अमोनियाचा लेव्हल एकसारखीच असायला हवी. पाण्याचा प्रवाहही नीट असायला हवा. यावेळी रझा मोहम्मदला दोन लाखांचा नफा झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.