जयपूर- राजस्थानमध्ये निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्यातच आता राजस्थानातील 28 आमदारांना जीवे मारण्याची धमकी आल्यानं वातावरण तणावग्रस्त झालं आहे. पोलिसांनी धमकी देणा-या आरोपीला अटक केली असून, तपास सुरू आहे. राजस्थानातील 28 आमदारांना धमकीचे मेसेज पाठवणारा आरोपी मुहम्मद हुसैन याला माणकचौक पोलिसांनी अटक केली आहे. शानदार चित्रपटासारखं हे प्रकरण आहे.आरोपीनं मेसेजमध्ये लिहिलं की, खंडणीची रक्कम अजमेर दर्गा बाजारातल्या रुबी नामक मुलीकडे पोहोचवायची आहे. जसे मला पैसे मिळतील, तसे मी आमदारांना मारण्याची सुपारी कोणी दिली होती, त्या व्यक्तीनं नाव सांगेन. तुम्ही जर मला खंडणीची रक्कम दिली नाही, तर तुम्ही दिवाळी आणि येत्या निवडणुका पाहू शकणार नाही. आरोपीच्या या मेसेजमुळे आमदारांमध्येही काहीशी भीती होती. ही घटना अशा वेळी उजेडात आली, जेव्हा पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या बाडमेर जिल्ह्यात एका आमदाराला व्हॉट्सअॅपवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. आमदारानं खंडणीचे 60 लाख न दिल्यानं त्याला ठार करण्यात आलं.मेसेज मिळाल्यानंतर त्या आमदारांनी बाडमेरच्या पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. एकाच वेळी 28 आमदारांना जीवे मारण्याची धमकी आल्यानं पोलीस यंत्रणाही खडबडून जागी झाली. त्यानंतर रात्रभर आरोपीवर पाळत ठेवून पोलिसांनी त्याला अटक केली. धमकी देणारा तरुण हा महाराष्ट्रातल्या नाशिकचा रहिवासी आहे. अजमेर दर्गा बाजारात तो एक हॉटेलमध्ये वेटरचं काम करत होता. पोलिसांनी त्याचा मोबाईल तपासला असता 28 आमदारांचे नंबर आणि तो मेसेज पाठवल्याचं उघड झालं. पोलीस आरोपीची कसून तपासणी करत आहेत.
राजस्थानमधल्या 28 आमदारांना जीवे मारण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 1:10 PM