जयपूर: राजस्थान विधानसभा निवडणूकभाजपासाठी आव्हानात्मक ठरणार आहे. या राज्यातील भाजपाची सत्ता जाणार असल्याचं भाकित अनेक सर्वेक्षणांमधून वर्तवण्यात आलं आहे. राज्यातील प्रभावी असलेले राजपूत सध्या भाजपाविरोधात जाताना दिसत आहेत. त्यामुळे आता भाजपानं राजपुतांची नाराजी दूर करण्यासाठी 'राम' बाण बाहेर काढला आहे. राजस्थानात राजपूत समुदाय अतिशय प्रभावी समजला जातो. एकूण लोकसंख्येचा विचार केल्यास, राजपुतांचं प्रमाण 12 टक्के इतकं आहे. जवळपास दोन ते तीन डझन विधानसभा मतदारसंघांमध्ये राजपूतांची मतं निर्णायक ठरु शकतात. वसुंधरा राजे यांच्या कॅबिनेटमध्ये राजपूत समाजाचे तीन आमदार आहेत. तर एकाला राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. मात्र सध्या राजपूत भाजपावर नाराज आहेत. राजमहल जमीन वाद, पद्मावत चित्रपटाचा वाद, गँगस्टर आनंदपाल सिंहचा एन्काऊंटर, गजेंद्र सिंह शेखावत यांना वसुंधरा राजे यांच्याकडून होणारा विरोध यामुळे राजपुतांच्या मनात नाराजीची भावना आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि राजपूत नेते जसवंत सिंह यांचा मुलगा मानवेंद्र सिंह यांनी भाजपाला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राजपूत समाजाची वाढती नाराजी भाजपाला महागात पडू शकते. त्यामुळे आता भाजपानं 'राम'नामाचा आधार घेण्यास सुरुवात केली. राजपूत समुदायाची संघटना असलेल्या करणी सेनेचे लोकेंद्र सिंह कालवी काल अयोध्येला गेले होते. राम क्षत्रिय होते. त्यामुळे आम्ही रामाचे वंशज आहोत, असं कालवी यांनी म्हटलं. यावेळी कालवी यांनी रामजन्मभूमीचं दर्शन घेतलं. जेव्हा रामाचं भव्य मंदिर उभारण्यात येईल, तेव्हाच अयोध्येला येऊ अशी शपथ त्यांनी घेतली. त्यामुळे आता भाजपाला राजपुतांची नाराजी दूर करण्यासाठी 'राम'बाण उपाय सापडला आहे. रामनामाच्या मदतीनं राजपुतांना खूश करण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात येणार आहे.
Rajasthan Assembly Election: दुखावलेल्या राजपुतांसाठी भाजपाचा 'राम'बाण?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 2:57 PM