Rajasthan Assembly Election Results: राज्यात बंडोबांचा पूर; काँग्रेस-भाजपा सत्तेपासून दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 01:53 PM2018-12-11T13:53:09+5:302018-12-11T13:55:02+5:30
बंडखोरांमुळे दोन्ही पक्षांना मोठा फटका
जयपूर: राजस्थानात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. काही वेळापूर्वी काँग्रेस पक्ष 100 हून अधिक जागांवर आघाडीवर होता. मात्र त्यानंतर काँग्रेसची काही जागांवरील आघाडी कमी झाली. तर भाजपा जवळपास 85 मतदारसंघात आघाडीवर आहे. काँग्रेस आणि भाजपाला या निवडणुकीत बंडखोरांनी दणका दिला आहे. दोन्ही पक्षांमधील जवळपास 50 नेत्यांनी बंडाचा झेंडा उभारला. पक्षातून फुटलेले हेच नेते सध्या दोन्ही पक्षांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.
राजस्थानातील अनेक मतदारसंघांमध्ये काँग्रेस आणि भाजपामध्ये थेट मुकाबला होतो. मात्र बंडखोरांमुळे यावेळी तिरंगी सामना पाहायला मिळतो आहे. राजस्थानात विधानसभेच्या 200 जागा आहेत. यापैकी जवळपास 5 डझन जागांवर यावेळी तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. तर डझनभर जागांवर चौरंगी सामना पाहायला मिळतो आहे. निवडणुकीच्या तोंडावर हनुमान बेनीवाल यांनी भाजपाची साथ सोडून राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष स्थापन केला. या पक्षानं मारवाड आणि शेखावटी भागात जाट समाजाची मतं घेत भाजपाला धक्का दिला आहे.
सत्ताधारी भाजपानं यावेळी जवळपास 70 आमदारांची तिकीटं कापली. त्यामुळे अनेकजण नाराज झाले. यातील अनेकांची नाराजी दूर करण्यात भाजपाला यश आलं. मात्र काहीजणांनी बंडांचा झेंडा उभारला. वसुंधरांच्या मंत्रिमंडळातील सुरेंद्र गोयल यांनी जैतारणावरुन, राजकुमार रिणवा यांनी रतनगढमधून, ओमप्रकाश हुडला यांनी महुवामधून आणि धनसिंह रावत यांनी बांसावाडामधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. तर आमदार अनिता कटारा यांनी सागवाडामधून, देवेंद्र कटारा यांनी डुंगरपूरहून, नवनीत लाल निनामा यांनी घाटोलहून, किशनाराम नाई यांनी श्रीडूंगरगढमधून आणि गीता वर्मा यांनी सिकरायमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली.
राज्यात सत्ता स्थापनेच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेसलादेखील बंडखोरांनी दणका दिला. राजस्थानात दर पाच वर्षांनी सत्ताधारी पक्ष बदलतो. त्यामुळे काँग्रेसमधील अनेकजण तिकीटासाठी उत्सुक होते. त्यामुळेच तिकीटं जाहीर होताच बंडखोरी झाली. माजी केंद्रीय मंत्री महादेव सिंह खंडेला यांनी खंडेलामधून, माजी मंत्री बाबुलाल नागर यांनी दूदूमधून, माजी मंत्री रामकेश मीणा यांनी गंगापूर सिटीमधून, माजी आमदार संजय लोढा यांनी सिरोहीतून, माजी उपमुख्यमंत्री कमला बेनीवाल यांचे पुत्र आलोक बेनीवाल यांनी शाहपूरमधून आणि विक्रम सिंह शेखावत यांनी जयपूरमधील विद्याधर नगरमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसला.