जयपूर: राजस्थानात भाजपाचं कमळ कोमेजताना दिसतं आहे. निवडणुकीचे सुरुवातीचे कल पाहता काँग्रेसनं बहुमताचा आकडा पार केला आहे. राजस्थानमध्ये विधानसभेच्या एकूण 200 जागा आहेत. यापैकी 100 पेक्षा अधिक जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. तर भाजपा 80 मतदारसंघात पुढे आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, सचिन पायलट आघाडीवर आहेत. तर मुख्यमंत्री वसुंधरा राजेदेखील पुढे आहेत. राजस्थानची जनता दर पाच वर्षांनी सत्ताधारी बदलते, असा इतिहास आहे. तोच इतिहास कायम राहण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत तब्बल 163 जागा जिंकणाऱ्या भाजपाला मोठा धक्का बसण्याची दाट शक्यता आहे. तर मागील निवडणुकीत केवळ 21 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसची बहुमताच्या दिशेनं दमदार वाटचाल आहे. अशोक गेहलोत आणि सचिन पायलट या दोन्ही नेत्यांची नावं मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत होती. हे दोन्हीही नेते सध्या आघाडीवर आहेत. गेहलोत सरदारपुरामधून पुढे आहेत. तर पायलट यांनी टोंकमधून आघाडी घेतली आहे. राज्यात भाजपा पिछाडीवर असली तरी, मुख्यमंत्री वसुंधरा राजे झालरपाटण मतदारसंघातून पुढे आहेत. काँग्रेसनं त्यांच्याविरोधात मानवेंद्र सिंह यांना रिंगणात उतरवलं होतं. जसवंत सिंह यांचे चिरंजीव असलेल्या मानवेंद्र यांना काँग्रेसनं शिवऐवजी झालरपाटणमध्ये वसुंधरा राजेंविरोधात उमेदवारी दिली. मात्र ते सध्या पिछाडीवर आहेत. भाजपानं राज्यात केवळ एकच मुस्लिम उमेदवार दिला होता. भाजपानं टोंकमधून युनूस खान यांना उमेदवारी दिली होती. मात्र तेदेखील पिछाडीवर आहेत.
Rajasthan Assembly Election Results Live: राजस्थानचा काँग्रेसला 'हात'? बहुमताकडे दमदार वाटचाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 10:54 AM