जयपूर: अपक्ष आमदार हनुमान बेनीवाल यांनी नव्या पक्षाची स्थापना केली आहे. राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी असं या पक्षाचं नाव आहे. जयपूरमध्ये 10 किलोमीटर लांब रोड शो केल्यानंतर त्यांनी स्वतंत्र पक्षाची घोषणा केली. विशेष म्हणजे हनुमान बेनीवाल हे आधी भाजपामध्ये होते. मात्र मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्याशी मतभेद झाल्यानंतर ते पक्षातून बाहेर पडले. हनुमान बेनीवाल यांनी जयपूरमध्ये हुंकार रॅलीचं आयोजन केलं होतं. या रॅलीचा समारोप झाल्यावर त्यांनी भाषण केलं आणि स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. यावेळी व्यासपीठावर भारत वाहिनी पार्टीचे अध्यक्ष घनश्याम तिवारी उपस्थित होते. तिवारीदेखील आधी भाजपामध्ये होते. मात्र त्यांनीदेखील वसुंधराराजे यांच्या राजकारणाला कंटाळून भाजपाला रामराम केला. राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीच्या स्थापनेवेळी राष्ट्रीय लोकदलाचे उपाध्यक्ष जयंत चौधरी आणि समाजवादी पक्षाचे नेते संजय लाठरदेखील उपस्थित होते. यावेळी भाषण करताना बेनीवाल यांनी समविचारी पक्षांसोबत विधानसभा निवडणूक लढवण्याचा मानस व्यक्त केला. यामधून त्यांनी तिसऱ्या आघाडीचे संकेत दिले. राजस्थानात नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होईल. सध्या राज्यातील दोन प्रमुख पक्ष असलेल्या भाजपा आणि काँग्रेसनं उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. या पक्षांमधील असंतुष्टांना गळाला लावण्याचा प्रयत्न इतरांकडून सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर तिसऱ्या आघाडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हनुमान बेनीवाल हे जाट समाजाचे नेते आहेत. राज्यात जाट समाजाचं प्रमाण 12 टक्के आहे. राजस्थानात विधानसभेच्या 200 जागा आहेत. यातील 70 जागांवर जाटांची मतं निर्णायक ठरु शकतात. त्यामुळे बेनीवाल आणि तिसरी आघाडी भाजपासह काँग्रेससाठी डोकेदुखी ठरु शकते.
Rajasthan Assembly Election: भाजपामधून बाहेर पडलेल्या हनुमानाची वेगळी वाट; तिसऱ्या आघाडीच्या हालचाली जोरात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 7:20 AM