सभागृहात रणकंदन, राजस्थानमध्ये विधानसभा अध्यक्ष सभागृहातच ढसाढसा रडले, नेमकं घडलं काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 19:06 IST2025-02-25T19:03:24+5:302025-02-25T19:06:42+5:30
Rajasthan Assembly News: राजस्थान विधानसभेमध्ये मागच्या काही दिवसांपासून सातत्याने गदारोळ सुरू असून, या गोंधळादरम्यान, मंगळवारी विधानसभेचं कामकाज सुरू असतानाच अध्यक्ष वासुदेव देवनानी हे सभागृहातच ढसाढसा रडू लागले.

सभागृहात रणकंदन, राजस्थानमध्ये विधानसभा अध्यक्ष सभागृहातच ढसाढसा रडले, नेमकं घडलं काय?
राजस्थान विधानसभेमध्ये मागच्या काही दिवसांपासून सातत्याने गदारोळ सुरू असून, या गोंधळादरम्यान, मंगळवारी विधानसभेचं कामकाज सुरू असतानाच अध्यक्ष वासुदेव देवनानी हे सभागृहातच ढसाढसा रडू लागले. त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांच्यावर अपशब्द बोलल्याचा आणि अपमानित केल्याचा आरोप केला. तसेच मी आमदार बनण्याच्या पात्रतेचा नाही, असं मला वाटतं, असेही त्यांनी सांगितले. विधानसभा अध्यक्षांच्या या भावूक प्रतिक्रियेनंतर मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी स्वत: वासुदेव देवनानी यांच्या कक्षामध्ये जाऊन त्यांची भेट घेतली.
राजस्थान विधानसभेमधून काँग्रेसच्या सहा आमदारांचं निलंबन करण्यात आल्यानंतर सभागृहामध्ये मंगळवारी चर्चा करण्यात आली. सभागृहाच्या कामकाजादरम्यान, विधानसभा अध्यक्ष वासुदेव देवनानी म्हणाले की, भारतामध्ये लोकशाही व्यवस्था आहे. १९५२ पासून आजपर्यंत अशी घटना घडलेली नाही. मी सुद्धा पाच वेळा सदस्य म्हणून सभागृहात आलो आहे. मी कधीही असे शब्द ऐकलेले नाहीत. मी कधीही पक्षपात केलेला नाही. तरीही असे आरोप झाल्यावर वाईट वाटतं. एका पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी जी काही विधानं केली आहेत. त्यामुळे सभागृहाची गरिमा उद्ध्वस्त झाली आहे.
दरम्यान, आज सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर गोविंद सिंह डोटासरा म्हणाले होते की, हा माफी मागायला लावू इच्छित आहे. याच्या बापाची जहागीर नाही आहे. माफी मागायची झाली तर माझी चप्पल माफी मागेल. हा माणूस माफी मागण्याच्या लायक नाही आहे. कक्षामध्ये आश्वासन दिलं आणि आता सभागृह चालवत आहे. नियम २९५ शिकवत आहे. आताच याला २९५ शिकवतो.
त्यानंतर डोटासरा यांनी काँग्रेच्या महिला आमदारांकडे कटाक्ष करत सांगितले की, आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत. बांगड्या भरणाऱ्या तर या आहेत. त्यानंतर ते विधानसभा अध्यक्षांना उद्देशून ते म्हणाले होते की, तू कायमचा निघून जा. जो मान देण्याच्या लायकीचा नाही, त्याच्याशी चपलांची भाषा बोलली जाते. आम्ही याला खुर्चीवर बसू देणार नाही, डोसरा यांच्या या बोचऱ्या विधानांमुळे विधानसभा अध्यक्ष भावूक झाले. तसेच त्यांना नंतर अश्रू आवरणे कठीण झाले.