जयपूर: राजस्थानच्या बारामध्ये एका तरुणानं आत्महत्या केली आहे. जलवाडात वास्तव्यास असलेला तरुण मंगळवारी सकाळी गळफास लागलेल्या स्थितीत सापडला. पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. आत्महत्या करण्यापूर्वी त्यानं व्हॉट्स ऍपवर स्टेटस ठेवलं होतं. 'मी जातोय, माझं आयुष्य माझी वाट पाहतंय', असं स्टेटस ठेवून तरुणानं जीवन संपवलं.
जलवाडाचा रहिवासी असलेल्या ओमप्रकाश मेघवालनं (२४ वर्षे) आत्महत्या केली. तो ई-मित्र दुकान चालवायचा. सोमवारी रात्री चहा प्यायल्यानंतर तो खोलीत झोपायला गेला. रात्री १२ वाजून ४ मिनिटांनी त्यानं व्हॉट्स ऍपवर स्टेटस ठेवलं. त्यानंतर रात्री उशिरा त्यानं गळफास लावून आत्महत्या केली.
मंगळवारी सकाळी ६ वाजता ओमप्रकाशची आई त्याला उठवायला खोलीत गेली. त्यावेळी ओमप्रकाश गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घरी पोहोचले. त्यांनी मृतदेह खाली उतरवून तो शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला.
मृतदेहाजवळ कोणतीही सुसाईट नोट मिळाली नसल्याचं नाहरगढ पोलीस ठाण्याचे प्रमुख दलपत सिंह यांनी सांगितलं. पत्नीच्या त्रासामुळे ओमप्रकाश मानसिक तणावाखाली होता, असा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.