जयपूर - भाजपाचेराजस्थानचे प्रदेशाध्यक्ष मदनलाल सैनी यांनी मुघल सम्राट अकबराबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. अकबर महिलांच्या वेशात मीना बाजारमध्ये जात होता. तसेच तेथे जाऊन तो महिलांची छेड काढायचा असं वक्तव्य सैनी यांनी केलं आहे. राजस्थानमध्ये सत्तेत असणाऱ्या काँग्रेसने सैनी यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर टिका केली केली.
मेवाडचे राजे महाराणा प्रताप यांची गुरुवारी (6 जून) जयंती साजरी करण्यात आली. राजस्थानमधील जयपूर येथील भाजपाच्या प्रदेश मुख्यालयामध्ये महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. भाजपाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमानंतर सैनी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अकबराबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
'अकबराने मीना बाजारची स्थापना केली. फक्त महिलांना तेथे काम देण्यात आले होते. पुरुषांना मीना बाजारात जाण्यास बंदी होती. अकबर तेथे जाऊन महिलांसोबत दुष्कर्म करायचा. या सर्वाची इतिहासामध्ये नोंद आहे' असं मदनलाल सैनी यांनी म्हटलं आहे. तसेच अकबराने एका राजपूत महिलेची छेड काढण्याचा प्रयत्न केला असता तिने अकबराला धडा शिकवल्याचा दावा सैनी यांनी केला आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष सैनी यांनी 'अकबराला किरण देवी यांची छेड काढायची होती. मात्र त्या सतर्क होत्या. त्यांनी अकबराला जमिनीवर पाडले आणि त्याच्या छातीवर छोटा सुरा ठेवला. त्यावेळी ‘हिंदुस्तानचा बादशाह तुझ्यासमोर नतमस्तक होतोय’ असं म्हणत अकबराने त्यांच्याकडे जिवाची भीक मागितली. या घटनेनंतर मीना बाजार बंद करण्यात आला' असं म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र आलं होतं. राजस्थानचे भाजपा प्रदेशाध्यक्ष मदनलाल सैनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जीवे मारण्याच्या आलेल्या धमकीवजा पत्रासंदर्भात खुलासा केला होता. सैनी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी समारंभाआधी भाजपाच्या प्रदेश मुख्यालयाला एक पत्र आलं होतं. ज्यात मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या नावानं हे निनावी पत्र आलं होतं. त्यावर भाजपाच्या मुख्यालयाचा पत्ता देण्यात आला होता. चिठ्ठीत लिहिलं होतं की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी समारंभात त्यांच्या छातीत गोळ्या झाडण्यात येणार आहेत.
ही चिठ्ठी पाठवणाऱ्यानं आपलं नावंही दिलं होतं. त्या चिठ्ठीवर पाठवणाऱ्याचा पत्ताही देण्यात आला होता. या धमकीपत्रात राकेश टांक, भैय्या पारीक, आणखी एकाचा उल्लेख होता. या चिठ्ठीवर देण्यात आलेला पत्ता हा जयपूरचा होता. चिठ्ठीमध्ये जयपूरमधल्या आमेर रोडवरच्या कच्चा बंधा, गणेश कॉलनीतील शिवाड भागाचा पत्ता देण्यात आला होता. चिठ्ठी मिळाल्यानंतर आम्ही ती पोलिसांच्या हवाली केली होती. पोलिसांनी त्या आरोपींवर काय कारवाई केली हे अद्याप समजलेलं नाही. पोलिसांनी त्या आरोपींवर काय कारवाई केली याची माहिती घेऊन सांगेन, असंही सैनी यांनी म्हटलं होतं.