राजस्थानमधील अलवर येथील भाजपाचे मंडल अध्यक्ष राजेंद्र सैनी यांच्या मुलाने राहत्या घरी गळफास घेत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून, हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच राजस्थानचे वनमंत्री संजय शर्मा यांनी रुग्णालयात धाव घेतली. दरम्यान, या घटनेनंतर केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनीही अलवरमधील आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.
ही घटना आरवली विहार पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सोनवा डुंगरी येथे घडली. याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, एका तरुणाने जीवन संपवल्याची माहिती सकाळी मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टेमसाठी पाठवला. मृत तरुणाचं नाव गौरव सैनी असून, तो भाजपाचे स्थानिक नेते राजेंद्र सैनी यांचा मुलगा होता. काही अज्ञात कारणांमधून त्याने घरातच गळफास घेऊन जीवन संपवले.
गौरव सैनी याचे वडील राजेंद्र सैनी हे भाजपाचे केशवनगरमधील मंडल अध्यक्ष आहेत. या घटनेचाी माहिती मिळताच राजस्थानचे वन आणि पर्यावरण मंत्री संजय शर्मा यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. त्यांच्यासोबत भाजपाचे अनेक कार्यकर्तेही उपस्थित होते. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनीही अलवरमधील आपले सर्व कार्यक्रम रद्द करून मृत तरुणांच्या नातेवाईकांचं सांत्वन केलं.
पोलिसांनी मृत तरुणाबाबत दिलेल्या माहितीनुसार हा तरुण बी.टेकचं शिक्षण घेत होता. तसेच सुट्टी असल्याने घरी आला होता. यादरम्यान, त्याने गळफास घेऊन जीवन संपवले. पोलिसांना घटनास्थळावरून सुसाइ़़ड नोट सापडलेली नाही. त्यामुळे या घटनेमागचं कारणं शोधणं कठीण झालं आहे. सध्यातरी पोलिसांनी नातेवाईकांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. तसेच मृत तरुणाच्या मित्रांकडे चौकशी केली जात आहे. जीवन संपवण्यामागचं कारण न समजल्याने पोलीस हे अधिक तपास करत आहेत.