राजस्थानमध्ये 25 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काँग्रेस, भाजपासह इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवार निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. त्याचवेळी निवडणुकीत मतदानाच्या मुद्द्यावरून वाद आणि मारामारी सुरू झाली आहे. चुरूमध्ये असंच एक प्रकरण समोर आलं आहे. येथे मतदानाच्या मुद्द्यावरून दोन भावांमध्ये हाणामारी झाली. नंतर प्रकरण इतकं वाढलं की एका भावाने दुसऱ्या भावाच्या कानाला चावा घेतला. यानंतर त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
मिळालेल्या माहितीनुसार, हे धक्कादायक प्रकरण चुरू जिल्ह्यातील अमरपुरा गावातील आहे. चुरू मुख्यालयातील जिल्हा रुग्णालयाच्या आपत्कालीन वॉर्डमध्ये आलेल्या जखमी जय सिंह (52) यांनी सांगितलं की, ते अमरपुरा गावचे रहिवासी आहेत. मतदानाच्या मुद्द्यावरून त्यांचा भाऊ राकेश यांच्याशी वाद झाला. त्यांचा भाऊ राकेश यांची त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने काँग्रेस पक्षाला मतदान करावं, अशी इच्छा होती. या मुद्द्यावरून दोन भावांमध्ये वाद झाला.
मतदानाच्या मुद्द्यावरून भावांमध्ये जोरदार हाणामारी
हा वाद इतका वाढला की त्यांचा भाऊ राकेश हे त्यांचे नातेवाईक जगदीश, सुनील आणि देवकरण यांच्यासह त्यांच्या घरी आले. त्यानंतर मारहाण केली आणि कानाचा चावा घेतला. कान चावल्यानंतर रक्तस्त्राव झाला. त्यानंतर कुटुंबीय जखमी जय सिंह यांना चुरू येथील जिल्हा रुग्णालयात घेऊन गेले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर जय सिंह यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच रुग्णालय पोलीस पोहोचले आणि त्यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली.
घराघरात निवडणुकीची चर्चा
सध्या घराघरात निवडणुकीची चर्चा सुरू आहे. या चर्चेचे रूपांतर कधी वादात होईल, हे सांगता येत नाही. या निवडणुकीच्या चर्चेत विविध पक्षांचे समर्थक एकमेकांना भिडल्याची अनेक प्रकरणे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. निवडणुकीतील मतं आणि पाठिंब्याबाबत गावोगावी भांडणं पूर्वीपेक्षा खूपच वाढली आहेत. निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचल्यानंतर त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.