Rajasthan Budget 2023 Highlight: राजस्थानचा अर्थसंकल्प मांडणाताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना शुक्रवारी अत्यंत अस्वस्थ परिस्थितीला सामोरे जावे लागले. अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान त्यांनी चुकून मागील वर्षाचा अर्थसंकल्प वाचून दाखवला. मागील अर्थसंकल्पात इंदिरा गांधी नागरी रोजगार हमी योजना लागू करुनही या अर्थसंकल्पीय भाषणात पुन्हा त्याचे वाचन झाले. ही बाब सदस्यांच्या लक्षात येताच मुख्यमंत्र्यांना याची माहिती देण्यात आली. यानंतर मुख्यमंत्री गेहलोत यांनी माफी मागून चालू वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला.
दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या या चुकीला हलगर्जीपणाचा मुद्दा बनवत विरोधकांनी सभागृहात प्रचंड गदारोळ सुरू केला. मुख्यमंत्र्यांना आपली चूक लक्षात येताच त्यांनी भर सभागृहात आपल्या चुकीबद्दल माफी मागितली. मात्र, त्यानंतरही विरोधक शांत झाले नाहीत. विरोधकांचा गदारोळ पाहून अध्यक्ष डॉ.सी.पी.जोशी यांनी सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले. त्यानंतरही विरोधकांनी गोंधळ सुरुच ठेवल्यामुळे सभापतींनी संतप्त होऊन अर्ध्या तासासाठी सभागृह तहकूब करुन बाहेर गेले.
या संपूर्ण घटनेवर सीएम गेहलोत म्हणाले की, बजेट लीक ही एक मोठी घटना आहे आणि कृपया त्याची विश्वासार्हता जपा. अर्थसंकल्पाच्या फाईलमध्ये एक जास्तीचे पान आले होते, पण मी वाचत असलेल्या अर्थसंकल्पीय भाषणाची प्रत तुम्हाला दिली जाईल.
पहिल्यांदाच कामकाज तहकूब झालेराजस्थानमध्ये अर्थसंकल्पादरम्यान सभागृहाचे कामकाज तहकूब करण्याची ही पहिलीच वेळ आहे. अशोक गेहलोत यांच्या चुकीनंतर विरोधकांनी सभागृहात जोरदार गदारोळ सुरू केला. सभापतींनी वारंवार विनंती करुनही विरोधी पक्षनेते मान्य न झाल्याने सभापतींनी सभागृहाचे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केले. या संपूर्ण घडामोडीवर राजस्थानचे विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनी हा अर्थसंकल्प मांडता येणार नसल्याचे म्हटले. याचे कारण म्हणजे, हा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच लीक झाल्याचा दावा त्यांनी केला.