जयपूर : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत व माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील तीव्र मतभेदांच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर रविवारी झाला. मंत्रिमंडळात १५ मंत्र्यांचा समावेश केला आहे. त्यात ११ कॅबिनेट दर्जाचे व ४ राज्यमंत्री आहेत. पायलट यांच्या पाच समर्थकांनाही नव्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.राज्यात २०२३ साली विधानसभा निवडणुका आहेत. पंजाबप्रमाणे इथेही काँग्रेसमधील मतभेद चिघळू नये याची दक्षता पक्षश्रेष्ठींनी या विस्तारावेळी घेतली. १५ मंत्र्यांपैकी ममता भूपेश बैरवा, भजनलाल जटाव, टिकाराम जुली यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती दिली आहे. गेल्या वर्षी सचिन पायलट समर्थकांनी बंड केल्यानंतर विश्वेंद्रसिंह व रमेश मीना या त्यांच्या समर्थकांना मंत्रिमंडळातून काढले होते. या दोघांची नव्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. इतर कॅबिनेट मंत्र्यांमध्ये हेमाराम चौधरी, महेंद्रजितसिंह मालवीय, रामलाल जाट, महेश जोशी, गोविंदराम मेघवाल, शकुंतला रावत यांचा समावेश आहे.जाहिदा खान, ब्रिजेंद्रसिंह ओला, राजेंद्र गुढा, मुरारीलाल मीना हे राज्यमंत्री आहेत. शकुंतला रावत, जाहिदा या महिला मंत्र्यांसह १२ नवे चेहरे आहेत. पाच जण पायलट समर्थक आहेत. चार दलित मंत्र्यांचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. नव्या १५ मंत्र्यांना त्यांच्या पदाची शपथ राज्यपाल कलराज मिश्र यांनी दिली.
‘मंत्रिमंडळ विस्तारामुळे सकारात्मक संदेश’राजस्थान मंत्रिमंडळाच्या विस्तारामुळे या राज्यात सकारात्मक संदेश गेला आहे. आता मंत्रिमंडळात दलित, आदिवासी व महिला मंत्र्यांची संख्याही वाढली आहे, असे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी म्हटले आहे.