राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय संकटादरम्यानच एक मोठी बाब समोर आली आहे. काँग्रेसची भारत जोडो यात्रा राजस्थानमध्ये येण्यापूर्वी सचिन पायलट आणि अशोक गहलोत एकत्र आले आहेत. काही दिवसांपूर्वी गहलोत यांनी सचिन पायलट हे गद्दार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता ते पुन्हा एकत्र आल्याचे दिसत आहेत.
“देश महागाई आणि बेरोजगारीसारख्या संकटाचा सामना करत आहे, तर राहुल गांधी शांततेचा संदेश देत आहेत. देशात वाढणाऱ्या तणावाचा सामना करण्याचं आव्हान आहे. राहुल गांधींचा संदेश सर्वांनी स्वीकार केला आहे,” अशी प्रतिक्रिया राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी दिली.
हेच पक्षाचं सौदर्य“भाजपला भारत जोडो यात्रेची भीती वाटते. भाजपचे लोक या यात्रेविरोधात भडकावण्याचं काम करतायत. राजस्थानात सर्वजण एक आहेत. आम्ही दोघं एकत्र आहोत. हेच पक्षाचं सौदर्य आहे,” असं गहलोत म्हणाले.
पायलट म्हणाले…“आम्ही निवडणूक आणि भारत जोडो यात्रेवर सविस्तर चर्चा केली आहे. भारत जोडो यात्रेबद्दल संपूर्ण देशात उत्साह आहे. सर्वजण एकत्र आहेत. राजस्थानमध्ये ही यात्र नंबर वन होईल,” असा विश्वास पायलट यांनी व्यक्त केला. भारत जोडो यात्रा ५ डिसेंबर रोजी राजस्थानात दाखल होणार आहे.
आधी म्हटलं गद्दारकाही दिवसांपूर्वी गहलोत यांनी पायलट यांना गद्दर म्हटलं होतं. तसंच ते आपली जागा घेऊ शकत नसल्याचंही सांगितलं होतं. त्यांनी २०२० मध्ये काँग्रेसच्या विरोधात बंड केलं आणि राज्य सरकार पाडण्याचे प्रयत्न केले होते, असं गहलोत म्हणाले होते.